नवी मुंबईतील ग्रामीण व शहरी भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून फिफ्टी-फिफ्टीच्या या व्यवहारात घर न मिळणाऱ्या एका रहिवाशाने सोमवारी आयुक्त भास्कर वानखेडे यांच्या दालनाबाहेर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून या रहिवाशाने अतिक्रमण उपायुक्तांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
नवी मुंबईतील अनेक गावांमध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. जुनी घरे तोडून त्या ठिकाणी टॉवर उभे राहत आहेत. काही वर्षांपूर्वी अनधिकृतरीत्या बांधण्यात आलेल्या चाळींची जागाही उंच इमारतींनी घेतली आहे. त्यामुळे घणसोली, गोठवली, तळवली, या गावांमध्ये तथाकथित बिल्डरांचे चांगलेच फावले आहे. सरकारने २२ जानेवारी २०१० रोजी गावातील ही अनधिकृत बांधकामे कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हापासून ही टॉवरसंस्कृती फोफावली आहे. ग्रामस्थांची घरे आता कधीच तुटणार नाहीत याची खात्री झाल्याने काही समाजकंटकांनी या जुनी घरे अथवा चाळी नव्याने बांधण्यास सुरुवात केली आहे. अशाच एका अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नाने सोमवारी पालिका मुख्यालयात आयुक्त दालनाबाहेर पेट घेतला. कोपरखैरणे सेक्टर-१९ मधील भूखंड क्रमांक ३७६ वर एक जुनी इमारत होती. एका विकासकाने या इमारतीतील रहिवाशांच्या मागे लागून तेथे इमारतीचे पुनर्विकासाचे काम हाती घेतले. यथावकाश इमारत उभी रहिली. पूर्वीच्या तीन मजल्यांऐवजी विकासकाने चक्क सात मजली इमारती बांधली. त्याला पालिकेच्या नगररचना विभागाने मंजुरी दिली आहे. या इमारतीत घरांबरोबरच काही व्यावसायिक गाळे काढण्यात आले आहेत. जुन्या इमारतींतील एक रहिवासी रमेश पिंडम यांना नवीन इमारतीत घर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी दाद मागितली पण त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे ही इमारत कशी अनधिकृत आहे हे पटवून देणारा पत्रव्यवहार त्यांनी पालिकेबरोबर केला पण मागील चार महिने या इमारतीवर कारवाई करण्याचे दुरापास्त झाले. अनधिकृत बांधकामविरोधी पथकाचे आयुक्त सुभाष गायकर यांचे या संदर्भात हात ओले झाल्याचा आरोपही या तक्रारदाराने केला आहे. अखेर सोमवारच्या लोकशाहीदिनी पिंडम यांनी आयुक्त भास्कर वानखेडे यांच्याकडे तक्रार केली. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नाही म्हणून या पिंडम यांनी पालिका आयुक्त दालनाबाहेर आल्यानंतर आपल्याजवळील बाटलीतील पेट्रोल काढले व अंगावर ओतून घेण्यास सुरुवात केली. ते दृश्य उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी पाहिले आणि त्यांनी तात्काळ धाव घेऊन त्याच्या हातातून ती बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या रहिवाशाला नंतर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

Story img Loader