नवी मुंबईतील सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींना सरकारने तीन वाढीव चटई निर्देशांक (एफएसआय) देण्याची तयारी दर्शवली असली तरी हे वेळकाढूपणाचे धोरण असल्याने रहिवाशांना नामंजूर आहे. जनतेच्या हरकती, लाल फितीमुळे होणारी दिरंगाई, उच्च न्यायालयाने इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट सादर करण्याचे दिलेले आदेश, सिडकोची ढासळलेली विश्वासार्हता, लवकरच लागणारी आचारसंहिता, सहनशीलतेचा झालेला अंत यामुळे सरकार तीन एफएसआय देत असताना जनता अडीच एफएसआयचा पुरस्कार करीत असून जे आहे ते पदरात पाडून घेण्यासाठी रहिवासी आग्रही आहेत.
नवी मुंबईत शेकडो इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. खाडीकिनाऱ्याच्या जमिनीवर भराव टाकून उभारण्यात आलेल्या नवी मुंबईतील इमारतींमधील लोंखडांच्या सळई खारट हवामानामुळे सडण्याची प्रक्रिया लवकर होत आहे. त्यामुळे इमारतींचे स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे अनेक इमारतींची पुनर्बाधणी करणे आवश्यक झाले आहे. वाशीतील अनेक रहिवाशांना सानपाडा येथील संक्रमण शिबिरात हलविण्यात आले आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतींची लवकरात लवकर पुनर्बाधणी करण्यात यावी अशी अनेक वर्षांची येथील रहिवाशांची मागणी आहे. त्यानुसार पालिकेने अडीच एफएसआयचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यावर नगरविकास विभागाने इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट आणि विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याची पूर्तता पालिकेने केलेली आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी अंतिम टप्यात असतानाच सिडकोने तीन एफएसआय देण्यात यावा अशी गुगली टाकली आहे. सिडको नवी मुंबईतील सर्व जमिनीची मालक असल्याने तिने असा प्रस्ताव सादर केलेला आहे. सिडकोने शहरातील सर्व रहिवाशांना भाडेपटय़ावर घरे दिलेली आहेत. त्यामुळे रहिवासी कागदोपत्री घराचे मालक असले तरी जमिनीची खरी मालक सिडको आहे. त्यामुळे सिडकोने तीन एफएसआयची मागणी केलेली आहे. राज्य सरकारचा लोकसंख्येने वाढणाऱ्या शहरांना तीन एफएसआय देण्याचा सार्वत्रिक विचार सुरू आहे. त्याची सुरुवात नवी मुंबईतून केली जाणार असल्याचे समजते. या सर्व निर्णयाला विलंब लागण्याची भीती नवी मुंबईतील रहिवासी व्यक्त करीत आहेत. त्यात सरकारने हा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यावर येणाऱ्या जनतेच्या हरकती, सरकारी कचाटय़ात अडकणाऱ्या फाइल्स, यामुळे अडीच-तीन करीत विधानसभेची गाडी निघून जाण्याची भीती रहिवाशांना आहे. त्यानंतर येणारे नवीन सरकार या मंजुरीला किती काळ घेईल याची खात्री नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती रहिवाशांना वाटत आहे. त्यामुळे जादा एफएसआय मिळाल्यानंतरही तो रहिवाशांना नको आहे. त्यात पहिल्यांदा अडीच द्या आणि शिल्लक अर्धा एफएसआय नंतर देण्यात यावा, अशी सूचना देखील रहिवासी मांडत आहेत.
रहिवासी गेली १५ वर्षे संक्रमण शिबिरात दिवस काढत आहेत. आघाडी सरकारचा दारुण पराभव झाल्यानंतरही त्यांना शहाणपण येत नाही. तीन एफएसआय ही वेळकाढूपणाचे धोरण आहे. घरांची पुनर्बाधणी लवकर करण्यात यावी इतकीच आमची इच्छा आहे
जयप्रकाश जगताप,
अवनी अपार्टमेंट वाशी सेक्टर -९.
तीन एफएसआय म्हणजे हे घोंगडे आणखी काही काळ भिजत ठेवण्यासारखे आहे. नगरविकास विभागाने सांगितल्यानंतर पालिकेने इॅम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट सादर केला आहे. मग आता पालिकेने प्रस्तावित केलेला एफएसआय का दिला जात नाही. आम्ही पंधरा वर्षे संक्रमण शिबिरात दिवस मोजत आहोत. सरकारचा हा नार्केतपणा त्यांच्या अंगाशी येणार आहे.
जयवंत गावडे,
श्रदद्धा अपार्टमेंट, वाशी

Story img Loader