महावितरण कंपनीच्या मनमानी भारनियमनामुळे संतापलेल्या नागरिकांनी यवतमाळातील तलाव फैलातील वीज उपकेंद्रातील साहित्यांची तोडफोड करून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. यावेळी युवकांनी एलएनकेव्ही पॅनलही फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी त्यांना अडविल्याने मोठा अनर्थ टळला.
तलाव फैलात महावितरणाचे ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र आहे. त्यावर तलावफैल, रामरहिमनगर, अंबिका नगर आदी नगरांना वीज पुरवठा करण्यात येतो. गेल्या काही महिन्यांपासून महावितरणने भारनियमनाच्या नावाखाली तासन्तास वीज पुरवठा बंद ठेवण्याचा प्रकार चालविला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तर महावितरणने कहर केला आहे. या केंद्रावरून विद्युत पुरवठा होणाऱ्या नगरात मोठय़ा प्रमाणात भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे संतापलेल्या योगेश बगमारे यांच्यासह दोन युवकांनी रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास उपकेंद्रावर धडक देऊन विद्युत पुरवठा का बंद आहे, असा जाब विचारत कार्यालयातील टेबल, काच, कूलर, खुच्यार्ंची तोडफोड केली.
कर्मचारी विक्रांत चौधरी, व्ही.एस.पाटील यांना धक्काबुक्की केली. कर्मचारी समजविण्याचा प्रयत्न करीत असतांना योगेश बगमारे याने आपल्या हातातील रॉड विद्युत पुरवठा करणाऱ्या एलएनकेव्ही पॅनलवर मारण्याचा प्रयत्न केला. युवकांचा कार्यालयातील गोंधळ पाहून कर्मचाऱ्यांनी शहर पोलिसांना पाचारण केले. मात्र, ते येण्याआधीच युवकांनी पळ काढला. कनिष्ठ अभियंता अरुण श्रीवास्तव यांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद नोंदविली. तोडफोड करणाऱ्या ग्राहकांना आमच्या उपकेंद्रांवरुन विद्युत पुरवठा करण्यात येत नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. शिवाय, भारनियमन सध्या बंद असून बगमारे या युवकाच्या घरचीच वीज बंद असल्यामुळे त्याने रागाच्या भरात कार्यालयातील साहित्यांची तोडफोड केली असल्याचे कनिष्ठ अभियंता श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
भारनियमनामुळे त्रस्त नागरिकांकडून वीज केंद्रातील साहित्याची तोडफोड
महावितरण कंपनीच्या मनमानी भारनियमनामुळे संतापलेल्या नागरिकांनी यवतमाळातील तलाव फैलातील वीज उपकेंद्रातील साहित्यांची तोडफोड करून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली.
First published on: 11-06-2014 at 08:23 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents broks the electric office for load shedding