उस्मानाबाद नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सरस्वती घोणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रेविता माणिक बनसोडे यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे. सिंधुताई पेठे या राष्ट्रवादीच्या नगरसेविकादेखील अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.
उस्मानाबाद पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यानुसार सरस्वती घोणे यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली होती. अडीच वर्षांत दोन जणांना अध्यक्षपदाची सूत्रे बहाल करण्याच्या पक्षाच्या भूमिकेनुसार घोणे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्याकडे सोमवारी सादर केला. राष्ट्रवादीचे माणिक बनसोडे यांच्या पत्नी नगरसेविका रेविता बनसोडे यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच प्रवर्गातील अन्य महिला नगरसेविका सिंधुताई पेठे यादेखील अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. पक्षश्रेष्ठींकडून कोणाच्या गळय़ात अध्यक्षपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे.
नगराध्यक्षांबरोबरच पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अफरोज पीरजादे आणि चंद्रकांत काकडे या दोन स्वीकृत नगरसेवकांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सादर केला आहे. सत्ताधारी पक्षाने एक वर्षांसाठी स्वीकृत नगरसेवकांची निवड केली होती. आता स्वीकृत नगरसेवकपदासाठी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चुरस वाढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांसह दोन्ही नगरसेवकांचा राजीनामा स्वीकारला असून, लवकरच अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे सांगितले.