पणन महासंघाचे राज्यभरातील पदाधिकारी व सर्व अधिकारी धनतेरसला वध्र्यात होणाऱ्या कापूस खरेदी हंगामाच्या शुभारंभास आवर्जून हजेरी लावणार आहेत. मात्र, या आवर्जून हजेरीमागे कापूस उत्पादकांच्या आनंदात सहभागी होण्याचा हेतू नाममात्र असून वध्र्यातील खास सरबराई व महत्वाचे म्हणजे येथील प्रसिध्द गोरसपाकची चव परत चाखण्याची या मान्यवरांची ईच्छा, शूभारंभासाठी वध्र्याची निवड करण्यास कारणीभूत ठरल्याचे लपून राहलेले नाही.
हो ना करीत एकदाचा कापूस खरेदीचा शुभारंभ कृषीमंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने धनतेरसला म्हणजे ११ नोव्हेंबरला करण्याचे ठरले. या विलंबामुळे तमाम बडया व्यापाऱ्यांनी चढया भावाने शेतकऱ्यांचा कापूस उचलला. हंगामाच्या मुहूर्तापेक्षा दिवाळसणाला कुटुंबात थोडेतरी आनंदाचे क्षण यावे म्हणून शेतकऱ्यांना कापूस विक्रीची घाई महत्वाची वाटली. धनतेरसला तारीख निश्चित झाल्यावर महासंघाच्या बैठकीत पुढचा विषय शुभारंभाचे स्थळ निश्चित करण्याचा होता. सर्वामुखी वध्र्याचे नाव निघाले. ते लगेच पक्के झाले.
विभागीय केंद्र नागपूर, जळगाव, औरंगाबाद व अन्य मोठी शहरे सोडून वध्र्यावर प्रेम करण्यामागे याठिकाणी होणारी सरबराई हेच एक मेव कारण या सर्वाच्या मनात होते. गत दोन वर्ष शुभारंभच झाला नव्हता. त्यापूर्वी दोनवेळा वध्र्यातच शुभारंभाचा कार्यक्रम झाला. यावेळी याच इतिहासाच्या स्मृती जाग्या झाल्या. गतवेळच्या कार्यक्रमात पदाधिकारी-अधिकारी अशा दोनशेवर मान्यवरांनी येथील खास सरबराई अनुभवली होती. चिकन, मटण, मासे व अन्य जलचर, बिर्याणी, साजूक तुपासह पुरणपोळी व अन्य खाद्यपदार्थाची रेलचेल व चांगली बडदास्त ठेवण्यात आली होती. मात्र, या चमचमीत मेजवानीशिवाय पाहुण्यांना भावला तो येथील गोरसपाक. वध्र्यात येणाऱ्या मान्यवर पाहुण्यांनी एकदा येथील गोरसपाकची चव चाखली की ते परत परत आठवण काढतात. पणनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी शुध्द तुपातील गोरसपाकची व पेढयाची चाखलेली चव यावेळी परत जिभेवर तरळली. आणि वर्धा कार्यक्रमस्थळ म्हणून निश्चित झाले. या पदार्थाचा मोह एवढा की बहुतांश पदाधिकाऱ्यांनी गोरसपाकचे खोकेही सोबत बांधून नेल्याची आठवण एका स्थानिक पदाधिकाऱ्याने नमूद केली. पदरचा पैसा खर्च करायचाच नव्हता. त्यामुळे घेशील किती दो कराने, अशीच सर्वाची अवस्था होती.
आता हे सर्व दीडशेवर मान्यवर परत आवर्जून उपस्थित राहणार. कारण त्यादृष्टीनेच महासंघाचा लवाजमा कामाला लागले आहे. या अनुषंगाने बोलतांना महासंघाचे एक जेष्ठ संचालक प्रा. वसंतराव कालैकर म्हणाले की शूभारंभाच्या कार्यक्रमाबाबत मराठवाडयासह सर्वच केंद्राच्या संबंधितांना विचारणा करण्यात आली होती. पण कुणीच तयार झाले नाही. वध्र्यातील सरबराई व गोरसपाकची सर्वानाच आठवण आहे. एखादया गावचा पदार्थ आवडत असेल, तर तो पाहुण्यांना देण्यात मात्र वावगे आहे? असा प्रश्नही कार्लेकरांनी केला.
काही पाहुणे धनतेरसच्या पूर्वसंध्येलाच येणार असून त्यांची व्यवस्था सहकारमहर्षी बापूराव देशमुख सूतगिरणीच्या विश्रामगृहात करण्यात आली आहे. शासकीय विश्रामगृहेही आरक्षित झाली. यजमानपद स्वीकारणारे सहकारनेते आमदार सुरेश देशमुख यांची महासंघाला हवी ती मदत मिळत आहे. पणन महासंघाच्या कारभारात नाराजी नोंदविणाऱ्या कृषीमंत्री विखे पाटलांना संतुष्ट करण्याची एकही संधी न सोडण्याचा सर्वाचा आटापिटा दिसून आला. महत्वाची बाब म्हणजे कापसाची बंडी शुभारंभासाठी पोहोचण्याचीही खबरदारी घेतली जात आहे. खुल्या बाजारात ४१०० रूपये प्रती क्विंटलाचा भाव मिळत असतांना ३८०० रूपयाच्या हमीभावाने शेतकरी किमान शुभारंभाच्यावेळी कापसासह उपस्थित व्हावा, असे खबरदारीमागचे कारण आहे. पण दीडशेवर पाहुण्यांचा ताफो मात्र सरबराईचा आनंद लुटण्यासाठी पोहोचणार, हे निश्चित..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा