‘सत्यमेव जयते’ उपक्रमाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त स्नेहालय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि अनैतिक मानवी वाहतूक या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत या वर्षात ‘बालकमुक्त देहव्यापार’ असा संकल्प करण्यात आला. यासंदर्भात प्रशिक्षण व मार्गदर्शनाची जबाबदारी स्नेहालयने घेतली असून, त्यासाठी विशेष कृती गट स्थापन करण्याची घोषणा संस्थेने कार्यशाळेच्या समारोपात केली.
एमआयडीसीतील स्नेहालयच्या प्रकल्पात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप गुरुवारी झाला. देशभरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे १६४ प्रतिनिधी या कार्यशाळेला उपस्थित होते. या सत्रास प्रमुख पाहुणे म्हणून शिवम प्रतिष्ठानचे इंद्रजित देशमुख यांच्यासह ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाचे निर्माते सत्यजित भटकळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, लॅन्सी फर्नाडिस, निळोबा जाधव, अ‍ॅड. श्याम आसावा आदी उपस्थित होते.
स्नेहालयचे प्रमुख प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी या सत्रात संस्थेची भूमिका मांडली. ते म्हणाले, महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशसह अन्य राज्यांतील दुष्काळाचे गंभीर सामाजिक परिणाम आता जाणवू लागले आहेत. दुष्काळामुळे होणाऱ्या स्थलांतराने महिला व बालकांच्या मानवी तस्करीला उत्तेजन मिळत असून त्याचे गांभीर्य वेळीच लक्षात घेऊन राज्य सरकारने जनावरांबरोबरच मुलांच्या छावण्या सुरू कराव्या अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. सामाजिक कार्यकर्त्यांनी दक्षता पथके स्थापन करून गावातील स्थलांतराच्या नोंदी ठेवाव्या, लालबत्ती भागात बारीक नजर ठेवून अल्पवयीन मुली व दुष्काळामुळे देहव्यापारात आणल्या जाणाऱ्या महिलांची तातडीने सुटका करावी आदी ठराव या वेळी करण्यात आले. त्यावर राज्य सरकारच्या स्तरावर पाठपुरावा करण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला.
देशमुख यांनी या वेळी पर्यावरणाच्या अनुषंगाने विविध मानवी समस्या मांडल्या. पर्यावरणाचा विनाश झाला तर, माणसांचे जीवनही अस्तित्वहीन होण्याची भीती व्यक्त केली. जाधव यांनी दुष्काळामुळे ग्रामीण भागातून स्थलांतरित होणाऱ्यांच्या बायोमेट्रिक नोंदी राज्य सरकारने ठेवाव्यात अशी मागणी केली. अशा स्थलांतरितांना पुन्हा गावात आणण्यासाठी कृतिआराखडा तयार करण्याचीही मागणी त्यांनी केली. आसावा यांनी पर्यावरणाच्याच अनुषंगाने वाळूतस्करीचे गांभीर्य स्पष्ट करताना त्यातून देहव्यापाराला उत्तेजन मिळत असल्याचे सांगितले. या गोष्टी टाळण्यासाठी वाळूतस्करी थांबवणे गरजेचे असून, त्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणावा लागेल असे ते म्हणाले. समारोपसत्राचे संदीप कुसाळकर यांनी सूत्रसंचालन केले. संजय गांधी यांनी आभार मानले.     

Story img Loader