घराच्या बाल्कनीत, बंगल्याच्या प्रांगणात, एक नाही, दोन नाही, चक्क हजार-दीड हजार झाडांच्या रोपांची उत्तम लागवड करून ती रोपे पावसाळ्यात नागरिकांना मोफत वाटप करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम नेरुळमधील एका निवृत्त दाम्पत्याने गेली २५ वर्षे अव्याहतपणे सुरू ठेवला असून संतांनी शिकवलेल्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे, या अभंगवाणीची खरी प्रचीती आणून दिली आहे.
शहरवाढीसाठी होणारी झाडांची कत्तल केवळ उघडय़ा डोळ्यांनी पाहून शांत न बसणाऱ्या निवृत शिक्षिका वैजयंती जोशी आणि त्यांचे पती निवृत कर्नल रवींद्र जोशी यांनी हे पर्यावरणरक्षणाचे कार्य हाती घेतले असून सैन्यदलातील बदल्यांमुळे भारतभर भ्रमंती करणाऱ्या जोशी यांनी झाडांची लागवड दिल्ली, पठाणकोट भागातही केली आहे. देशात होणारी झाडांची बेसुमार जंगलतोड, त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, उद्ध्वस्त होणारी पक्ष्यांची घरटी, वृक्षतोडीमुळे पावसाने सुरू केलेला लपंडाव, वाढते शहरीकरण, त्यासाठी झाडांची होणारी कत्तल, ग्लोबल वॉर्मिग यामुळे व्यथित झालेल्या वैजयंती जोशी यांनी पर्यावरणरक्षणाची सुरुवात स्वत:पासून सुरू केली. पती सैन्यदलात अधिकारीपदावर असल्याने जोशी दाम्पत्याला राहण्यास मिळणारी घरे ही प्रशस्त आणि आजूबाजूला मोकळी जागा असणारी होती. पहिल्यांदा शंभरेक झाडांपासून सुरू झालेली ही चळवळ नंतर एक ते दीड हजार रोपे संवर्धनापर्यंत गेली.
नवी मुंबईत जागेअभावी हा वेग आता कमी झाला आहे, तरीही शेकडोमध्ये ही लागवड सुरू आहे. यात शोभेच्या झाडांची लागवड टाळण्यात आली असून आंबा, जांभूळ, बकुळ, पिंपळ, उंबर, अशोक, चिकू, गुलमोहर, पेरू यांसारख्या फळ आणि फुलांच्या रोपांचा समावेश आहे. जोशीताईंचे आत्ताचे निवासस्थान हे एका बंगलेवजा घरात आहे. त्यामुळे या घरांच्या मागील बाजूस या रोपांची लागवड केली जात आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला सोसायटीनेही साथ दिली आहे. या वर्षी जागेअभावी दोनशे रोपांची लागवड करण्यात आली असून पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक नागरिक, संस्था यांनी ही रोपे नेऊन लावण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी त्या एका प्लॅटमध्ये राहत होत्या. तेथेही त्यांनी आपली ही आवड आणि चळवळ सोडली नव्हती. या रोपांचे संवर्धन, लागवड करण्यात जोशीताईंना कर्नल जोशींचेही तेवढेच सहकार्य मिळत आहे.  
या दाम्पत्याकडून नेरुळ सीबीडी वॉकर असोसिएशनने नेलेल्या ५५० झाडांनी आज नवी मुंबईतील एकमेव पारसिक टेकडी हिरवीगार झाली आहे. जोशी दाम्पत्याचे ही हिरवीगार टेकडी बघून मन प्रसन्न होत आहे. तीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. प्रत्येकाने आयुष्यात एक तरी झाड लावावे असे म्हटले जाते. जोशीताईंकडून रोप हवे असेल तर त्यांच्याशी ९२२१०४४८७३ या क्रमांकावर नक्कीच संपर्क साधावा, पण हो, त्या फार्महाऊस किंवा चैनीसाठी ही रोपे देत नाहीत. ज्यांना खरोखरच झाडे लावून ती जगवण्याची इच्छा आहे त्यांनी जोशी दाम्पत्याला संपर्क साधण्यास हरकत नाही.

Story img Loader