गावातील जमीन गावाबाहेरच्या नागरिकांना न विकण्याचा ठराव गोरेगावच्या ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. सरपंच मीरा नरसाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती बाबासाहेब तांबे यांनी सांगितले. असा निर्णय घेणारे गोरेगाव हे आदर्श गाव हिवरे बाजार (ता. नगर) नंतरचे जिल्हय़ातील दुसऱ्या क्रमांकाचे गाव ठरले आहे.
ग्रामाविकास तसेच जलसंधारणाची मोठी कामे झाल्याने राज्यातील नागरिक गोरेगावकडे आकर्षित झाले असून जलसंधारणामुळे काही काळानंतर गोरेगावमध्ये बारमाही पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील जमिनी खरेदी करण्याकडे नागरिकांचा विशेषत: पुणेकरांचा कल आहे. जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटांचा गोरेगाव परिसरात राबता वाढल्याने तांबे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जमिनींवरील अतिक्रमण थोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील वडीलधाऱ्या नागरिकांशी चर्चा करून गावातील जमिनी गावाबाहेरच्या लोकांना न विकण्याचा निर्णय घेण्यात आला.
गोरेगावची लोकसंख्या पाच हजार असून जमीनही पाच हजार एकर आहे. पाच हजार लोकांना दरडोई एक एकर क्षेत्र येत असल्याने या जमिनींची विक्री झाल्यास काही दिवसांनंतर गावातीलच नागरिकांवर भूमिहीन होण्याची वेळ येईल. त्यासाठी गावातील जमिनीची गावातच योग्य भावात विक्री करावी. बाहेरच्या लोकांना जमीन विकू नये असा ठराव करण्यात आला. तो टाळय़ांच्या गजरात मंजूर करण्यात आला. यापूर्वी डीजे बंदी, कूपनलिका बंदी, दारूबंदी यांसारखे ठराव करून गोरेगावने आदर्श गाव होण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. ग्रामपंचायतीची सत्ताही महिलांच्या हाती देऊन ग्रामस्थांनी महिला सबलीकरणास हातभार लावला आहे. ग्रामसभेस उपसरपंच शारदा नांगरे, माजी सरपंच राजाराम नरसाळे, दादाभाऊ नरसाळे, अभयसिंह नांगरे यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जमीन गावाबाहेरच्या नागरिकांना न विकण्याचा गोरेगावच्या ग्रामसभेचा ठराव
गावातील जमीन गावाबाहेरच्या नागरिकांना न विकण्याचा ठराव गोरेगावच्या ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. सरपंच मीरा नरसाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती बाबासाहेब तांबे यांनी सांगितले.
First published on: 11-11-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resolution of goregaon gram sabha do not sell of the land out of village citizens