वाई पालिकेच्या कामाबद्दल जाणूनबुजून चुकीची माहिती बोर्डद्वारे प्रसिद्ध करणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा ठराव पालिका सभेत मंजूर करण्यात आला.
वाई पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष निलीमा खरात यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेचा अंजठा व टिपणी उशिरा मिळाल्याचे कारण सांगून विरोधी आघाडी तीर्थक्षेत्र विकास आघाडीने बहिष्कार टाकला होता.
सभा सुरू होण्यापूर्वीच येथील किसन वीर चौकात बेकायदेशीरपणे फ्लेक्स बोर्ड लावून पालिकेच्या सार्वजनिक शौचालयांच्या कामावर चार हजार प्रति स्क्वेअर फूट दराने खर्च झाल्याचा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. प्रत्यक्षात या कामाबाबत किती खर्च झाला आहे याची टिप्पणी सभागृहाने मंजूर केलेली नसताना फलक लावून बदनामी केल्यामुळे सत्ताधारी जनकल्याण आघाडीच्या नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या व प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर, प्रशासन आणि सभागृह एकच असल्यामुळे सर्वाचा निर्णय मान्य करण्याचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले व या कामावर प्रत्यक्षात २६५१ रुपये स्क्वेअर फूट खर्च झाला असून अंतर्गत टाकीसह २१५० रुपये स्क्वेअर फूट बांधकाम खर्च झाल्याचे सभागृहाला सांगितले. सदस्यांच्या तीव्र भावना विचारात घेऊन नगराध्यक्षांनी याबाबत सविस्तर माहितीचे फलक त्याच ठिकाणी लावण्याची सूचना प्रशासनाला केली.
नगरसेवक नंदकुमार खामकर यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीवर अब्रुनुकसानीचा दावा प्रशासनाने दाखल करण्याचा ठराव मांडला. धनंजय मोदेंनी त्याला अनुमोदन दिले. याशिवाय यापुढे कोणाचाही फ्लेक्स बोर्ड लावणाऱ्याने पालिकेची रीतसर परवानगी घ्यावी. त्याची पावती कोपऱ्यात फ्लेक्स बोर्डबरोबर प्रसिद्ध करावी, म्हणजे फ्लेक्स बोर्ड किती दिवस राहणार आहे याचीही माहिती नागरिकांना होईल. याबाबत प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी असेही सुचविले.
यानंतर सभेचे कामकाज सुरळीत सुरू झाले. यानंतर पालिकेचे सर्व विषय मंजूर करून सभेचे कामकाज संपले. सभेला जनकल्याण आघाडीचे दत्तात्रय ऊर्फ बुवा खरात, नंदकुमार खामकर, सचिन फरांदे, कैलास जमदाडे, महेंद्र धनवे, अनुराधा कोल्हापुरे, शेवडे, जाधव, शिंदे आदी नगरसेवक उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा