मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज (मसीआ) व औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाएक्स्पो प्रदर्शनातील यंत्रसामुग्री पाहण्यासाठी औरंगाबादकरांनी रविवारी मोठी गर्दी केली होती. भरदुपारी गरवारे मैदानाच्या बाजूने जाणारे रस्त्यांवरील वाहतुकीचा वेगही मंदावला होता. वेगवेगळी यंत्रसामुग्री पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी गर्दी केली होती. या प्रदर्शनातून मोठी उलाढाल झाल्याचा दावा आयोजकांनी केला. आज दिवसभरात महाएक्स्पोत अपारंपरिक उर्जा या विषयावर चर्चा झाली. वेगवेगळ्या प्रकारची २३ पेटंट नावे असणाऱ्या गुंडू शब्दे यांनी मराठवाडय़ातील सौरऊर्जेच्या शक्तीचा ऊहापोह केला.
तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या या प्रदर्शनाचा समारोप आज झाला. शहरात सुरू असणारे वेगवेगळे उद्योग राज्यातील उद्योजकांना कळावेत. त्यातून उलाढाल वाढावी, असा प्रदर्शनामागचा हेतू होता. तो पूर्णत: यशस्वी झाला असल्याचे या वेळी सांगण्यात आले. मराठवाडय़ात सौरउर्जा निर्मिती अधिक वेगाने होऊ शकते. कारण कच्छपेक्षाही सूर्याची किरणे मराठवाडय़ात अधिक तीव्रतेने पडतात. त्यामुळे ऊर्जा विकासाला अधिक गती मिळू शकते. प्रदर्शनात अपारंपरिक ऊर्जेवरील विविध प्रकारचे प्रयोगही मांडण्यात आले होते. सौरशक्तीवर चालणारे वीजपंप आकर्षण होते.