मागील वर्षी जूनमध्ये कॉम्रेड पानसरे दोन दिवस माझ्या घरी मुक्कामास होते. त्यावेळी भाकप पक्ष संघटना, घरेलू कामगार संघटना व अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम नाशिक जिल्ह्यात नव्या पिढीने नव्या दमाने सुरू करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता नवीन पिढीची आहे, अशी भावना पानसरे यांचे जवळचे सहकारी येथील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. माधवराव गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
वयाच्या ९१ व्या वर्षांतही माधवरावांना पानसरे यांच्याबरोबर केलेले कार्य लख्खपणे आठवते. १९५२ पासून आजतागायत ६३ वर्षे डाव्या चळवळीत विविध पक्षीय आंदोलने आणि निवडणूक प्रचारात गोविंदराव आणि माधवराव या जोडगोळीने खांद्याला खांदा लावून काम केले. परंतु आघाडीची सत्ता देशात व राज्यात आणणे हे भाकपासाठी अजूनही स्वप्नच राहिले. माधवराव यांची उमेदवारी असलेल्या किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या मनमाड नगरपालिका, विधानसभेच्या प्रत्येक निवडणूक प्रचारार्थ पानसरे आठ-आठ दिवस मनमाडला थांबत. प्रचार सभांमध्ये घणाघाती भाषणे करत. जेव्हा थेट नगराध्यक्ष पद्धतीने माधवराव निवडून आले, त्यावेळी पानसरे यांना गहिवरून आले होते.
१९८५ च्या निवडणुकीत माधवराव विधानसभेत निवडून गेले. त्यावेळी तर पानसरे यांनी अभिमानाने माधवरावांना मिठीच मारली. खासदारकीच्या निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघात विखे पाटलांविरुद्ध दोन लाखांच्या जवळपास मते माधवरावांनी घेतली. तेव्हाही पानसरेंनी माधवरावांच्या लढतीचे कौतुक केले. जणूकाही माधवरावांचे जिंकणे-हारणे हे त्यांचेच व्यक्तीगत यश अपयश बनले होते. मनमाडला तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते माधवरावांचा अमृतमहोत्सवी सत्कार झाला. त्यावेळी जणू घरचेच कार्य असल्यागत पानसरे यांनी माधवरावांच्या घरी आठ दिवस मुक्काम ठोकला होता.
भाकप, शेकाप, माकप यांचा समावेश असलेली डावी आघाडी हा काँग्रेस व भाजपला समर्थ असा पर्याय होऊ शकतो यावर ़ पानसरे आणि माधवरावांचा दृढ विश्वास होता. अनेकदा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विविध आंदोलनात कॉ. डांगे, कॉ. ए. बी. वर्धन, भालचंद्र कानगो, एन. डी. पाटील, प्रभाकर संझगिरी, गणपतराव देशमुख, गंगाधर चिटणीस यांच्याबरोबर पानसरे आणि माधवराव यांनी जोडीने काम केले. आता पानसरे यांच्या हत्येनंतर नवीन पिढीवर जबाबदारी आल्याचे माधवराव गायकवाड यांनी नमूद केले.
बलिदान व्यर्थ जाणार नाही
येवला : व्यवस्था परिवर्तनासाठी उभे आयुष्य वेचणाऱ्या कॉ. गोविंद पानसरे यांचे बलिदान कधीही वाया जाणार नाही, असा सूर येथे आयोजित श्रध्दांजली सभेतून निघाला.
येथील हुतात्मा स्मारकात राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र अंनिस, छात्रभारती, शेतकरी पंचायत, समता प्रतिष्ठान, प्रागतिक विचार व्याख्यानमाला आदी संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे होते. सभेत सर्वप्रथम सर्वच कार्यकर्त्यांनी पानसरे यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला. समाजातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला आदी कष्टकऱ्यांसाठी झटणाऱ्या माणसाच्या जगण्याआड येणाऱ्या धर्म व जातीची खुलेआम चिकीत्सा मागणाऱ्या एका विचारवंताची ही हत्या म्हणजे शांत डोक्याने घेतलेला बळी असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. अंनिसचे तालुका अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे यांनी विचाराला विचाराने उत्तर देण्याची आणि चिकित्सक भूमिकेचे स्वागत करण्यात प्रामाणिकपणा आणि धैर्याची गरज असते, असे सांगितले. मात्र ज्यांचे विचार मुळातच कोते, अप्रामाणिक आणि पलायनवादी आहेत. ते भित्रे लोक काही वर्षांपासून असे भ्याड हल्ले करत आहेत, असे नमूद केले. अ‍ॅड. शिंदे यांनी पुरोगामी आणि विवेकवादी विचार थांबविण्याची ही कोणती रीत, असा प्रश्न उपस्थित करून काही वर्षांपासून समाजात धर्माचे प्राबल्य वाढताना दिसत असल्याचे सांगितले. माणसे धार्मिक झाल्याचे वरवर दिसत असले तरी माणूसं दांभिक झाल्याचंही लपून राहिलेले नाही. अशा दांभिकांना चिकित्सा नको असते. अशा या प्रतिगामी शक्ती प्रसंगी कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकरांसारख्या विचारवंताचे बळी घेतात. आता महाराष्ट्र सरकारने राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याची जाण ठेवून डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा कसुन शोध घेण्याची मागणी अ‍ॅड. शिंदे यांनी केली. याप्रसंगी संभाजीराजे पवार, प्रा. डॉ. अजय विभांडिक, प्राचार्य गुमानसिंह परदेशी, अविनाश पाटील, नानासाहेब कुऱ्हाडे आदींनीही आदरांजली वाहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा