उदगीर शहरात गेले तीन दिवस संचारबंदी लागू आहे. एखाद्या घटनेचा परिपाक काय होतो, याचीच अनुभूती उदगीरकर सध्या घेत आहेत. गेल्या १४ व १५ मार्चला उदगीर शहरात इज्तेमाचे आयोजन केले होते. याच दरम्यान उदगीरमधील उदयगिरी किल्ल्यातील उदगिरी महाराजांच्या समाधीवरील झेंडा कोणा तरी माथेफिरूने काढून तेथे दुसरा झेंडा रोवला. पुजाऱ्याचे याकडे लक्ष गेले. त्याने या बाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी विलंब न लावता हा झेंडा काढून तेथे पूर्ववत पहिला झेंडा लावला. मात्र, या घटनेचे वृत्त काही क्षणातच शहरात पसरले.
माथेफिरूला अटक करण्याची मागणी झाली. पोलिसांनी लवकरात लवकर संबंधितांना अटक केली जाईल, असे सांगून टाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजताच पोलीस ठाण्यात मोठय़ा संख्येने जमाव जमला व माथेफिरूला अटक करण्याची मागणी झाली. त्यासाठी ठिय्या आंदोलनाची तयारी जमावाने चालवली होती.
पोलिसांनी आम्ही आमचे काम अधिक गतीने करीत आहोत. जमावाने वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करू नये, अशी विनंती केली. मात्र, जमाव काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यातून शहरभर किरकोळ स्वरूपात दगडफेक, जाळपोळीचे प्रकार घडले. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या.
दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे पोलिसांनी अधिक काळजी घेत दुपारनंतर संचारबंदी लागू केली. परंतु सलग तीन दिवस संचारबंदी लागू केल्यामुळे लोकांचा संताप कमी झाला. पोलिसांनी समयसूचकता दाखवत दोन्ही समाजात तेढ वाढू न देण्याची काळजी घेतली. सोमवारी सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत संचारबंदी शिथिल केल्यानंतर बाजारपेठेत लोकांची गर्दी उसळली. जो-तो गरजेच्या वस्तू तातडीने खरेदी करून घर गाठण्याच्या तयारीत होता. प्रशासनाने सर्व पक्षाच्या मंडळींना एकत्र करून शांतता कमिटीची बैठक घेतली. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. मात्र, निरपराध्यांना त्रास होणार नाही, याचीही काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे, अशी मागणी या वेळी सर्वानी केली. या घटनेत सुमारे १२० जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हे नोंदवले.
उदगीर शहर संवेदनशील आहे. गेल्या काही वर्षांत दहशतवादी कारवायांचे ते केंद्र बनते आहे. जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोट घडवण्याचा कट उदगीर शहरात रचला गेला. बनावट नोटांच्या प्रकरणात उदगीरमधील राजकारण्याचा मुलगा सापडला. राजकीय दबावापोटी पोलीस कारवाई करीत नाहीत. सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळे देशविघातक कृत्य करणाऱ्या मंडळींची मुजोरी वाढत आहे. सामान्य जनता भेदरलेल्या अवस्थेत आहे. भविष्यात पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत, या कडे पोलीस कोणती भूमिका वठवणार आहेत, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांची जबाबदारी वाढली!
उदगीर शहरात गेले तीन दिवस संचारबंदी लागू आहे. एखाद्या घटनेचा परिपाक काय होतो, याचीच अनुभूती उदगीरकर सध्या घेत आहेत. गेल्या १४ व १५ मार्चला उदगीर शहरात इज्तेमाचे आयोजन केले होते.
First published on: 20-03-2013 at 02:52 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Responsiblity is increase on police to stop the recurrence