राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांनी घेतलेल्या निर्णयाला विद्वत परिषदेचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी मंगळवारी झालेल्या विद्वत परिषदेत हिरवी झेंडी दाखविली. हाविद्यालयांवरील प्रवेशबंदी हटविण्यास अध्यक्षांनी सहमती दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रवेशबंदीचा गोंधळ का घातला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. विद्यापीठ संलग्न सुमारे ७५ ते ८० महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी हटविण्यास विद्वत परिषदेचे अध्यक्ष सहमत झाले. येत्या सहा मार्चला न्यायालयात होणाऱ्या सुनावणीदरम्यान विद्यापीठाच्यावतीने सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रासाठी इत्थंभूत माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ज्या महाविद्यालयात एक किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत, त्या ७५ ते ८० महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ज्येष्ठ सदस्य डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले. ज्या महाविद्यालयावर एकाही शिक्षकाची नियुक्ती नाही, त्यांच्यावरील प्रवेशबंदी कायम ठेवण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठाचे संलग्निकरण नसलेल्या महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी कायम राहणार आहे. मात्र, सहा महिन्यापूर्वी विद्यापीठाने लादलेल्या प्रवेशबंदीनंतर ज्या महाविद्यालयांनी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करून त्यांना नेमण्यास पुढाकार घेतला अशा महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी हटविण्याविषयी प्राधिकरणांनी वेळोवेळी जोर लावला होता. आजच्या विद्वत परिषदेत प्रशासनाने हिरवी झेंडी दाखवून त्या ७५ ते ८० महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी हटविण्यास संमती दर्शवली. त्यामुळेच गेली सहा महिने विद्यापीठ प्रशासनाने कुलगुरूंसह प्रवेशबंदी हटविण्यास नकार देऊन गोंधळ का घातला, असा प्रश्न काही सदस्यांच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. प्रवेशबंदी हटवण्यास पात्र ठरलेल्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची संख्या, त्यांचा प्रवेशाचा दिनांक या माहितीची जमवाजमव करणे सुरू आहे. प्राधिकरणांनी आधीच कुलगुरूंचे हात मजबूत केलेले असताना पुन्हा पुन्हा विषय प्राधिकरणांकडे का वळता केला जातो, असा संताप सदस्यांनी व्यक्त केला आहे.

परीक्षेचा मार्ग मोकळा : पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल पुरवणी परीक्षा किंवा उन्हाळी परीक्षेच्या तोंडावर जाहीर केले जात असल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागायचे. अशा विद्यार्थ्यांचे निकाल परीक्षेच्या तोंडावर जाहीर होऊन त्यात ते उत्तीर्ण झाल्यास त्यांना वरच्या वर्गाची परीक्षा देण्याचा मार्ग आजच्या विद्वत परिषदेने मोकळा केला आहे.

Story img Loader