अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न, अपुरा वेळ आणि प्रश्नांची काठीण्यपातळी तुलनेत जास्त यामुळे बारावीच्या भौतिकशास्त्राच्या परीक्षेत यंदा बहुतांश विद्यार्थ्यांची दांडीच उडणार ही भीती अखेर खोटी ठरली आहे. उलट मुंबईच नव्हे तर राज्यभरातच भौतिकशास्त्रात उत्तीर्णतेचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. त्यामुळे भौतिकशास्त्राच्या परीक्षेसंबंधात काही विद्यार्थी तसेच शिक्षकांनी निर्माण केलेली भीती हा बागुलबुवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भौतिकशास्त्र हा विषय घेऊन परीक्षा दिलेल्या ८३,०५० विद्यार्थ्यांपैकी ७०,९३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची ही टक्केवारी तब्बल ८६.०० टक्के आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ८५.०७ टक्के होते. ‘केवळ भौतिकशास्त्राचाच नव्हे तर अभ्यासक्रमांच्या लांबीमुळे चर्चेत आलेल्या रसायनशास्त्राचाही निकाल यंदा चांगला लागला आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘एस. पी. क्लासेस’चे प्रा. सुभाष जोशी यांनी व्यक्त केली. तुलनेत गणित आणि जीवशास्त्र या विषयांचा निकाल स्थिर आहे. प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण २०वरून ३०वर नेण्याचा निर्णय या विषयांच्या निकालातील वधारणेस कारणीभूत ठरल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर कधी नव्हे एवढे ‘आयआयटी’ प्रवेशासाठी बारावीच्या गुणांना आलेले महत्त्वही विज्ञान शाखेच्या निकालातील वाढीला कारणीभूत ठरल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
बारावीच्या प्रमुख विषयांचा अभ्यासक्रम यंदा ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या (सीबीएसई) धर्तीवर बदलण्यात आला होता. त्यामुळे, त्याची लांबी व काठीण्यपातळी वाढली होती. त्यातून भौतिकशास्त्र इतरांच्या तुलनेत जरा कठीणच. बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना पहिल्यांदा सामोरे जावे लागले ते भौतिशास्त्रालाच. हे ध्यानात ठेवून या वर्षी उलट ‘राज्य शिक्षण मंडळा’ने अभ्यासक्रमाबाहेरच्या प्रश्नांना हातही लावला नव्हता. तरीही काही विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीही (खासकरून क्लासच्या) पेपरची लांबी जास्त होती, प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे होते, अशी हाकाटी करून गोंधळ उडवून दिला. इतकेच नव्हे तर फेसबुक, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी, मंडळाची हेल्पलाइन या माध्यमातून या विषयाची परीक्षा पुन्हा घ्या, अशी मागणीही होऊ लागली. राज्याच्या इतर भागांपेक्षा मुंबई-पुण्यासारख्या भागातूनच ही मागणी पुढे येऊ लागल्याने या सगळ्याच्या मागे काही ठरावीक क्लासचालक असल्याची चर्चा पुढे येऊ लागली. पुण्यातील काही क्लासचालकांनी तर काही स्वयंसेवी संस्थांनाच यासाठी हाताशी धरले होते. पण, बारावीच्या निकालानेच या पेपरविषयी केले जाणारे सर्व अंदाज खोटे ठरविले आहेत.
‘भौतिकशास्त्राच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचे स्वरूप नेमके कसे असणार याचा अंदाज कुणालाच नव्हता. एरवी गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडविण्याचा खूप सराव विद्यार्थी परीक्षेआधी करतात. पण, सीबीएसईच्या धर्तीवर तयार करण्यात आलेला भौतिकशास्त्राचा सुधारित अभ्यासक्रम जुन्या अभ्यासक्रमापेक्षा कितीतरी वेगळा आहे. त्यामुळे, प्रश्नांचा अंदाज न आल्याने काही विद्यार्थ्यांना पेपर कठीण वाटला असावा,’ अशी प्रतिक्रिया अंधेरीतील एका महाविद्यालयातील भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांनी दिली. तर ‘प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आपल्याला सोडविता आले पाहिजे, ही अपेक्षाच मुळाच चुकीची आहे. त्यामुळे, भौतिकशास्त्राच्या पेपरसंबंधात निर्माण झालेला गोंधळ विनाकारण होता,’ अशी प्रतिक्रिया या विषयाचे प्राध्यापक विनायक काटदरे यांनी व्यक्त केली.

गुरुवारचा दिवस महाविद्यालयांसाठी निकालांचा ठरला. बारावी, तृतीय वर्ष वाणिज्य आणि तृतीय वर्ष विज्ञान अशा तीन परिक्षांचा निकाल गुरुवारी घोषित झाला. स्वाभाविकच, प्रदीर्घ सुट्टीनंतर महाविद्यालयांचे आवार पुन्हा एकदा तरुणाईच्या हास्यविनोदाने, थट्टामस्करीने आणि उत्फुल्लतेने गजबजून गेली. छाया: दीपक जोशी

विज्ञानाच्या काही प्रमुख विषयांचा निकाल टक्केवारीत (मुंबई विभाग)
विषय…….२०१२…२०१३
गणित…….८६.५८…८६.१२
रसायनशास्त्र…८८.२०…८९.४४
भौतिकशास्त्र…८५.०७…८६.००
जीवशास्त्र….९०.७८…९०.३७

Story img Loader