एका उद्योजकाला नक्षलवादी असल्याचे सांगत दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका आरोपीस दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. हा आरोपी वायुसेनेचा सेवानिवृत्त सरजट निघाला. न्यायालयाने आरोपीस २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सुनील रत्नाकर गुट्टे यांची सुनील हायटेक इंजिनिअरिंग कंपनी असून तिचे कार्यालय रामदासपेठेत आहे. ९ मे २०१२ रोजी त्यांच्या कार्यालयात एक पत्र आले. त्यात दीड कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. ती न दिल्यास जिवे मारण्याची तसेच कार्यालयास हानी पोचवल्या जाईल, अशी धमकी होती. सुनील गुट्टे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांना धमक्या येऊ लागल्या. त्यांच्या व्यवस्थापकाच्या मोबाईलवरही धमकीचा एसएमएस आला. नक्षलवादी असल्याचे सांगत सतत सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. अखेर मंगळवारी सुनील गुट्टे यांनी सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.
 याप्रकरणी पोलिसांनी गोपनीयता बाळगली होती. नक्षलवादी असल्याचे आरोपीने सांगितल्याने दहशतवादविरोधी पथकाने समांतर तपास सुरू केला. ज्या क्रमांकावरून एसएमएस आला तो क्रमांक एका बँक अधिकाऱ्याच्या नावावर होता. मोबाईल हरविल्यामुळे त्याने दुसरा मोबाईल घेतला, मात्र त्याची तक्रार पोलिसांकडे केली नव्हती. दहशतवादविरोधी पथकाने या क्रमांकाच्या आधारे मोबाईल वापरणाऱ्याचा ठावठिकाणा शोधला आणि आरोपी रामबालक सत्यनारायण सिंह (रा. विद्यानगर) याला अटक केली.