‘‘कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला काही गावांकडून विरोध होऊ लागल्याने हा प्रश्न रेंगाळला आहे. हद्दवाढीशिवाय शहराचा विकास अशक्य असल्याने हद्दवाढ ही गरजेची आहे. त्यामुळे हद्दवाढीला विरोध केल्यास त्या गावांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा द्यायच्या की नाही याबाबत गांभीर्याने विचार केला जाईल,’’ असा इशारा महापौर कादंबरी कवाळे यांनी बैठकीत दिला. शहराच्या हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांच्या सोयी-सुविधा बंद करण्यात याव्यात, अशी मागणी गेल्या महिन्यामध्ये महापालिका कर्मचारी संघाने केली होती. त्याचबरोबर हद्दवाढीबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या पाश्र्वभूमीवर महापालिकेमध्ये महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महापौर कवाळे म्हणाल्या,‘‘शासनाने हद्दवाढीसाठी अधिसूचना काढल्यानंतर हद्दवाढीस जी गावे विरोध करतील, त्या गावांना महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा बंद करण्याबाबत विचार केला जाईल. महापालिकेच्या स्थापनेपासून शहराची एकदाही हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे शहराचा विकासही खुंटलेला आहे.’’ या वेळी उपमहापौर दिगंबर फराकटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, उपायुक्त संजय हेरवाडे, अश्विनी वाघमळे, महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई, एम. डी. राठोड, सभागृह नेता श्रीकांत बनछोडे उपस्थित होते.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा