मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या एका वाघिणीचा चित्तथरारक प्रवास ‘रिटर्न ऑफ टायग्रेस’ या नावाने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास करीत असतानाच, या चित्रपटाची निवड आता येत्या आठवडय़ात पुण्यात आयोजित किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात करण्यात आली आहे. २८ देशांतून तब्बल १४० चित्रपट या महोत्सवाकरिता आले होते, त्यातील मोजक्या चित्रपटाची निवड या महोत्सवाकरिता करण्यात आली. त्यातच नागपूर परिसरातील या वाघिणीचा चित्तथरारक, पण यशस्वी प्रवास या चित्रपटाच्या निमित्ताने आता इतर देशासमोर मांडला जाणार आहे.
साडेतीन वर्षांपूर्वी ७ फेब्रुवारी २०११ला कातलाबोडीच्या जंगलालगतच्या शेतातील ३५ फूट खोल विहिरीत वाघीण पडली. त्या वाघिणीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणे अतिशय कठीण होते. वनखात्याची चमू आणि स्वयंसेवींचा मदतीचा हात कामी आला. सीएसी ऑलराउंडरचे संचालक अमोल खंते आणि त्यांच्या चमूने यात सहकार्य केले. मात्र, गर्भवती असलेल्या या वाघिणीने जीवन आणि मृत्यूच्या लढाईत पोटात असलेल्या तीन बछडय़ांना गमावले. या परिस्थितीत तिच्यावर उपचार करणे कठीण होते. डॉ. दक्षिणकर, डॉ. उपाध्ये, डॉ. धूत आणि डॉ. भोजने यांच्या चमूने तिच्यावर उपचारच केले नाहीत, तर तीन बछडे गमावल्यामुळे मानसिक धक्का पोहोचलेल्या या वाघिणीला सावरले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र दिल्यानंतर तिला जंगलात सोडण्याचा निर्णय अवघ्या आठ दिवसात तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) दिनेशचंद्र पंत यांनी घेतला. त्यानंतर तत्कालीन वनसंरक्षक रामबाबू, सहाय्यक वनसंरक्षक गिरीश वशिष्ठ, किशोर मिश्रीकोटकर, अविनाश अंजीकर यांनी मानद वन्यजीवरक्षक कुंदन हाते, सेमिनरी हिल्सचे गुणवंत खरवडे, तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी वीरसेन यांच्या मदतीने तिला १४ फेब्रुवारी २०११ला जंगलात सोडले. वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप टेकाडे यांनी घेतलेल्या काळजीमुळे कळमेश्वरच्या जंगलात ही वाघीण यशस्वीपणे वावरत आहे. तिने तीन बछडय़ांना जन्म दिला असून, ते सुद्धा या जंगलात सरावले आहे. साधारपणे संकटात सापडलेला वन्यजीव जंगलात कमी आणि पिंजऱ्यातच अधिक ठेवल्याची उदाहरणे आहेत. मात्र, संकटात सापडलेल्या या वाघिणीला अवघ्या सात दिवसांत यशस्वीपणे जंगलात सोडण्याचा हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला.
या वाघिणीचा विहीरीत पडण्यापासूनचा तर जंगलात सोडण्यापर्यंतचा प्रवास ‘रिटर्न ऑफ टायग्रेस’ या नावाने कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर या चित्रपटाने प्रचंड गर्दी खेचली. संकटात सापडलेल्या वाघिणीला नंतर पिंजऱ्यात कैद ठेवू नये, तर जंगलात तिचे पुनरुज्जीवन करता येते, असा संदेश देणाऱ्या या चित्रपटाचे अनेक नामवंतांनी कौतुक केले. देशांतर्गत प्रवास केल्यानंतर हा चित्रपट आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवासाठी अगदी सहज म्हणून पाठवण्यात आला. देशविदेशातून शंभराहून अधिक चित्रपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवातील प्रवेशासाठी धडपडत असताना ‘रिटर्न ऑफ टायग्रेस’ची निवड नागपूर वनखात्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात येणार असून, त्यासाठी ही चमू पुण्याला रवाना होणार आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘रिटर्न ऑफ टायग्रेस’ची भरारी
मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या एका वाघिणीचा चित्तथरारक प्रवास ‘रिटर्न ऑफ टायग्रेस’ या नावाने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास करीत असतानाच, या चित्रपटाची निवड आता येत्या आठवडय़ात पुण्यात
First published on: 10-01-2015 at 08:17 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Return of tigress in international film festival