बाहेरील पाण्याचा एकही थेंब न घेता उसातीलच पाण्याचा पुनर्वापर करत साखर निर्मिती करण्याचा अभिनव प्रयोग गुरुदत्त शुगर्स साखर कारखान्याने साकारला आहे. यामुळे दररोज सुमारे ५ लाख लिटर आणि १२० दिवसाच्या हंगामात सुमारे ७ कोटी लिटर इतकी पाण्याची प्रचंड बचत होणार आहे. ऊस पीक व साखर उत्पादन हे दोन्ही घटक मुबलक पाणी वापरामुळे टिकेचे धनी होत चालले असताना गुरुदत्त साखर कारखान्याचा हा पथदर्शी प्रकल्प राज्यातील साखर कारखानदारीसमोर कृतिशील वस्तुपाठ म्हणून पुढे आला आहे.
सनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे ४५०० मे.टन ऊस गाळप करणारा खासगी क्षेत्रातील पहिलाच साखर कारखाना सात वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष माधवराव भगवानराव घाटगे यांनी कल्पकतेने नवनवे तंत्रज्ञान वापरून संपूर्ण साखर कारखाना अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न केला आहे. बदलत्या काळाचा वेध घेऊन साखर उद्योगात घाटगे यांनी केलेले प्रयोग कारखान्याच्या हिताचे ठरले आहेत. ब्राझील येथे त्यांनी साखर कारखान्यातील पाणी बचतीचा प्रकल्प पाहिला. त्यापासून प्रेरणा घेत त्यांनी कृष्णा काठच्या आपल्या कारखान्यात या उपक्रमाचे अनुसरण करण्याचे ठरविले. गुरुदत्तच्या कार्यस्थळावर गेली तीन वष्रे पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे प्रयोग सुरू आहेत. पहिल्यावर्षी २५ टक्के, दुसऱ्या वर्षी ५० टक्के तर तिसऱ्या व यंदाच्या हंगामात हा प्रयोग १०० टक्के यशस्वी ठरला आहे. या प्रकल्पावर सुमारे ३ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. कारखान्यासाठी हंगामात औद्योगिक दराने पाणी खरेदी करावे लागते. त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या देयकाचा विचार करता अवघ्या ४ वर्षांत हा प्रकल्प कर्जमुक्त होतो, असे घाटगे यांचे मत आहे.
एक टन ऊस गाळपानंतर उसातील ७०० लिटर पाणी मिळते. कारखान्याने हे पाणी वाया न घालवता ओव्हरहेड गरम पाण्याच्या टाकीद्वारे प्रक्रिया केली आहे. कारखाना प्रतिदिन ४ हजार ५०० मे.टन उसाचे गाळप करतो. एकूण गाळपातून ३१ लाख ५० लिटर इतके पाणी प्रक्रिया करण्यासाठी मिळते. हे पाणी प्रति तासास ५० टन या गतीने कुिलग करण्यात येते. पुढे गंजविरोधक रसायन, स्केल विरोधक रसायन व शेवाळविरोधक रसायन वापरून शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. यानंतर हे पाणी सी.पी.यू. प्रकल्पात सोडले जाते. सी.पी.यू. प्रकल्पानंतर पाणी गाळप प्रक्रिया सॅण्ड फिल्टर, अँक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर व नंतर रेजिन बेडद्वारे फिल्टर करून फिड टँक व नंतर कंट्रोल पॅनेल व अल्ट्रा फिल्ट्रेशनद्वारे आरओ प्लँटमध्ये अंतिम शुद्धीकरणासाठी सोडले जाते. या नंतर शुद्ध पाणी व अशुद्ध पाणी अशाप्रकारे पाण्याचे दोन ठिकाणी साठे केले जातात. तर अशुद्ध पाण्यावरसुद्धा प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध केले जाते. अंतिम टप्प्यातील आरओ प्लँटमधून बाहेर पडणाऱ्या शुद्ध पाण्याचा वापर बॉयलरसाठी प्राधान्याने केला जातो. तसेच कारखानांतर्गत आवश्यकतेनुसार या पाण्याचा वापर केला जात असल्याचे घाटगे यांनी सांगितले.
अधुनमधून उद्भवणारी दुष्काळजन्य परिस्थिती पाहता, या नवीन प्रकल्पाची आता राज्यातील सर्व कारखान्यांनाच गरज निर्माण झाली आहे. यासाठी सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतून इच्छुक साखर कारखान्यांना मोफत मार्गदर्शन करण्याची आपली तयारी आहे. त्यामुळेच या प्रकल्पाचे पेटंट घेण्याचाही आपला विचार नाही, असे घाटगे यांनी नमूद केले. सध्या हा प्रकल्प पाहण्यासाठी राज्यातील साखर कारखान्याचे प्रतिनिधी भेटी देत असून, नुकतीच पांडुरंग साखर कारखाना व विठ्ठल साखर कारखाना पंढरपूर तसेच नॅचरल शुगर उस्मानाबाद या साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी भेटी देऊन माहिती घेतली आहे.
वॉटर ट्रिटमेट प्लँटसाठी माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एन. विश्वनाथन, पर्यावरण अधिकारी घनश्याम मोरे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे प्रकल्पासाठी स्टेनलेस स्टील व फायबर मटेरियलचा भारतीय तंत्रज्ञानानुसार कुशलतेने वापर केला आहे. प्रकल्प पूर्णपणे स्वयंचलित करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ दोन कर्मचाऱ्यांवर संपूर्ण कामकाज चालते
तर राज्यात साडेसातशे कोटी लिटर पाण्याची बचत होईल
राज्यात सुमारे १५० सहकारी व खासगी कारखाने आहेत. त्यातील १०० कारखाने आíथकदृष्टय़ा सक्षम आहेत. त्यांनी या प्रकारच्या उपक्रमाचे अनुसरन करायचे ठरवले तर राज्यभरात दरवर्षी सुमारे ७५० कोटी लिटर पाण्याची बचत होणार आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होणारे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी उपलब्ध होऊ शकते. उसाच्या शेतीमुळे राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण होत असल्याचे विधान नुकतेच शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केले होते. तथापि साखर कारखान्यात पाणी बचतीचा गुरुदत्त पॅटर्न राबविला गेल्यास ऊस शेतीवर उठसूठ टिका करणाऱ्यांना कृतिशील उत्तरच मिळू शकेल.