शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची केलेली तोडफोड, तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी असभ्य वर्तणुकीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्य़ातील सर्व तहसीलमधील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखणी बंद आंदोलन केले. ग्रामसेवक, तलाठी आदी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
सोमवारी शिवसेनेने काढलेल्या मोर्चादरम्यान शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दगडफेक करून तोडफोड केली. तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाची या प्रकारचा निषेध करीत महसूल संघटनांनी लेखणी बंद आंदोलन केले. सोमवारी रात्री सावली विश्रामगृहावर निवासी उपजिल्हाधिकारी विश्वांभर गावंडे यांच्या नेतृत्वाखाली महसूल संघटनांनी पालकमंत्री प्रकाश सोळंके यांना निषेधाचे निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेली असभ्य वर्तणूक ही निंदनीय असून या प्रकारचा संघटनांनी निषेध केला. मंगळवारी सकाळी जिल्हाभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच तहसीलमध्ये शुकशुकाट होता.
महसूल कर्मचाऱ्याच्या लेखणी बंद आंदोलनाची कल्पना नसल्यामुळे कामानिमित्त खेडेगावातून आलेल्या अनेक नागरिकांचा हेलपाटा झाला. उद्या (बुधवारी) दैनंदिन कामकाज होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यासह पाथरी, जिंतूर, पालम, पूर्णा, गंगाखेड मानवत, सोनपेठ या सर्वच तहसील कार्यालयात लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तलाठी संघटनाही सहभागी झाली.

Story img Loader