तहसिलदारांच्या अनुपस्थितीत त्यांची पिवळ्या दिव्याची गाडी घेऊन संशयास्पद स्थितीत आढळलेल्या महसूल खात्याच्या पथकास आमदार विजय औटी यांनीच आज ढवळपुरी शिवारात रंगेहात पकडले. कथित वाळूतस्करी विरोधी कारवाईबाबत या पथकातील चालकासह सात जणांचे पारनेर पोलीस ठाण्यात जबाब घेण्यात आले असून तहसीलदारांचे वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तहसीलदार जयसिंग वळवी यांचाही याप्रकरणी जबाब नोंदविण्यात येणार असून त्यानंतर कारवाईची दिशा ठरले. दरम्यान महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांचा हा उच्छाद आपण विधानसभेत मांडणार असल्याचे औटी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ढवळपुरीच्या छावणीचे उदघाटन करून पारनेरकडे परतत असताना तहसिलदारांची गाडी ढवळपुरीच्या दिशेने जात असल्याचे औटी यांच्या निदर्शनास आले. या वाहनास थांबविण्याची सुचना औटी यांनी आपल्या गाडीच्या चालकास केल्यानंतर चालकाने गाडीचा लाईट दाखवून थांबण्याचा इशारा केला. मात्र औटी यांची गाडी पाहून तहसिलदारांच्या गाडीवरील चालकाने सुसाट वेगाने पुढे नेली़  गाडी न थांबल्याने औटी यांना संशय आला. त्यांनी या गाडीचा पाठलाग करून ती पकडल्यानंतर साराच प्रकार पुढे आला.  
तहसिलदारांच्या गाडीच्या चालकाकडे गाडीचे लॉगबुक नव्हते, पथकाकडे वाळूविरोधी कारवाई अथवा तत्सम बाबींचा लेखी आदेशही नव्हता. औटी यांनी अधिक चौकशी केली असता तहसीलदार जयसिंग वळवी हे आढावा बैठकीसाठी नगरला गेल्याचे सांगण्यात आले. त्यांना नगर येथे सोडून गाडीचालक गाडी घेऊन भाळवणी येथे आला. तेथे पारनेरहून दुचाकीवर आलेले सहा कर्मचारी त्यांना सामील झाले. तसेच हे सारे ढवळपुरीकडे निघाले होत़े  कोणत्याच गोष्टीचे समाधानकारक उत्तर न मिळू शकल्याने औटी गाडीसह या पथकास पारनेरच्या तहसील कार्यालयात घेऊन आले.
नायब तहसीलदार देवराम कावरे या सर्व प्रकाराबाबत अनभिज्ञ होते. गाडीच्या लॉगबुकावर दि. ३१ डिसेंबरपर्यंतच्याच नोंदी होत्या. भरारी पथकाच्या आदेशाची प्रत पाहिली असता पथकातील दोघांना वगळून हे पथक कारवाईसाठी निघाले होते. विविध प्रश्नांवर निरूत्तर झालेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची सुचना औटी यांनी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विकास सोमवंशी यांना यांनी केली.
मंडलाधिकारी ए. ए. फुलमाळी, जवळयाचे तलाठी एस. एन. उंडे, करंदीचे तलाठी ऐ. बी. मंडलीक, देवीभोयऱ्याचे तलाठी एस. जे. ठुबे, किन्हीचे तलाठी होळकर, म्हसणेच्या तलाठी श्रीमती गावीत यांचा वाळूतस्करी विरोधी भरारी पथकात समावेश आहे. या पथकातील होळकर व श्रीमती गावीत यांना वगळून हे पथक कार्यालयातील कर्मचारी उमेशकुमार शिंदे व राजेंद्र ढगे यांना कारवाईसाठी घेऊन निघाले होते. होळकर व श्रीमती गावीत यांना वगळून पथकात सहभागी झालेल्या सहा कर्मचाऱ्यांसह चालक भिवसेन कोलते यांचे जबाब घेण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा