भारतीयांच्या जीवनमानात धार्मिक ग्रंथ म्हणून गीता अनन्य महत्वपूर्ण मानली जाते. गीतेवर अनेक अभ्यासक, धर्मचिंतक व पुरोहितांनी आपापले चिंतन विविधांगाने केलेले आहे. मराठीत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्थितप्रज्ञाचे वर्णन केलेले आहे. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीकाच आहे. आचार्य विनोबा भावे यांनीही हे तत्वज्ञान गीताई च्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवल्याचे जाणवते. कुठलाही धर्मग्रंथ केवळ आध्यात्मिक आकलनाने चर्चिला जावा, असे नसून त्याकडे निरामय भावनेने पाहता आले पाहिजे. त्यावर सर्वसामन्यांना आपले विचार व्यक्त करता आले पाहिजे, हे लोकशाहीने बहाल केलेले स्वातंत्र्य आहे. म्हणूनच ‘गीता तत्वज्ञानाची उलटतपासणी’ या ग्रंथाचे लेखक शशिकांत हुमणे वकिली बाण्याने एका तत्वज्ञानाची तपासणी करताना दिसतात.
उलटतपासणी कोर्टात केली जाते. गीता हे कौरव-पांडवांच्या घराण्यातील भांडणाप्रसंगी त्यातील एका योद्धाला शस्त्र उचलवण्यास व कर्मयोग सांगणारे उपदेशपर भाषण होय. ते तीन लेखकांनी लिहिले आहेत, असे हुमणे म्हणतात. एकाने काही अध्याय ‘कर्म’ दुसऱ्याने ‘व्यवहार’ व तिसऱ्याने ‘आध्यात्म’ अशा टप्प्याटप्याने समाजात कर्मकांडात गुंतवले आहे. गीतेची उलटतपासणी करताना हुमने बुद्धाचे तत्वज्ञान घेऊन त्याकडे पाहतात. इ.स.पू. ५०० मध्ये बुद्ध, तर इ.स.पू. १२ शतकात गीतेचा जन्म झाला. गीता तपासताना ते ज्ञानेश्वरीही तपासतात. डॉ. गंगासहाय प्रेमी, दुर्गा भागवत, शं.के. पेंडसे, आनंद साधले, इरावती कर्वे, प्रेमा कंटक, खं.त्र्यं. सुळे, अशा अनेक अभ्यासकांची मते नोंदवताना गीतेच्या मूळ तत्वज्ञानाचे मूल्यमापन करताना हुमणे दिसतात. इंग्रजी, मराठी, हिंदी व अन्य भाषांतील तत्सम ग्रंथांचाही ते आधार घेताना दिसून येतात.
शशिकांत हुमणे यांचा हा अभ्यास कुठल्याही धार्मिक आकसापोटी नाही, तर व्यासंगी मर्मज्ञाच्या दृष्टीतील अभ्यास आहे. चांगल्या व वाईटाची लेखकाला जाण आहे. कर्मकांडाच्या मागे न जाता विवेकवादी दृष्टीने तत्वज्ञान अभ्यासण्याचा हुमणे यांचा हेतू महत्वपूर्ण वाटतो. कॉर्ल मॉर्क्स म्हणतात, ‘धर्म ही अफूची गोळी आहे.’ ही गोळी पचवून मार्मिकपणे वस्तूनिष्ठ मांडणीच हुमणेंनी केली आहे. त्यात त्यांनी अनेक आक्षेप घेतले आहे. ते अभ्याकांनी अभ्यासावे एवढेच. १६८ पृष्ठांचा हा ग्रंथ सुगावा प्रकाशन पुणे प्रकाशित केला आहे. त्यांची किंमत १४० रुपये असून वाचकांना ही उलटतपासणी नवी दृष्टी देणारी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा