विदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यापूर्वी येथील परीक्षा द्यावी लागते. ही अट दूर करण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाब नबी आझाद यांनी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला दिले.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात आलेल्या डॉक्टर पार्थ जोशी, डॉ. अविनाश काळे, डॉ. रोहित अग्रवाल यांनी दिल्ली येथे आझाद यांची त्यांच्या मंत्रालयात भेट घेतली व त्यांना याबाबत असलेल्या अडचणी सांगितल्या. संपूर्ण भारतात याप्रकारची अडचण असल्याचे व त्यामुळे चांगल्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवेला देश मुकत असल्याचे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
रशियासारख्या देशातही परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्यांना रशियात कोणतीही वेगळी परीक्षा न देता वैद्यकीय व्यवसाय सुरू करता येतो. भारतात मात्र अशा विद्यार्थ्यांना भारताची परीक्षा द्यावीच लागते. त्याचे निकालही लवकर लागत नाहीत. त्यामुळे देशात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी उत्साहाने आलेल्यांची निराशा होते व ते परत परदेशात जाण्याच्या मागे लागतात, असे शिष्टमंडळातील विद्यार्थ्यांनी आझाद यांना सांगितले.

Story img Loader