राज्यातील यंत्रमाग उद्योगाला सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्याबाबत या उद्योगातील तज्ज्ञ लोकप्रतिनिधींशी विचारविनिमय करून मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा फेरविचार केला जाईल. तसेच यंत्रमाग कामगाराला म्हाडाच्या मदतीने घरकुल देण्याबाबत आणि यंत्रमागांचे आधुनिकीकरण करण्याबाबत लवकरच शासनाकडून ठोस निर्णय घेतले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या यंत्रमाग उद्योग स्थिरावलेल्या शहरातील आमदारांच्या शिष्टमंडळास दिले.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षां या निवासस्थानी सुमारे पाऊण तास पृथ्वीराज चव्हाण यांनी शिष्टमंडळाशी विस्ताराने चर्चा केली. यावेळी भिवंडी पश्चिमचे आमदार अब्दुलरशिद ताहीर मोमीन व भिवंडी पूर्वचे आमदार रूपेश म्हात्रे व इतर उपस्थित होते. आमदार हाळवणकर यांनी इचलकरंजी येथे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या यंत्रमाग कामगारांच्या बेमुदत संपाकडे लक्ष वेधले. या संपावर कामगार व मालक प्रतिनिधी यांच्यात चर्चा करून तोडगा काढला जात असला तरी यंत्रमाग कामगारांना शासनाकडून शाश्वत लाभ देणे गरजेचेअसून वस्त्रोद्योग धोरणात यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल योजना जाहीर होऊनसुध्दा त्यांची मार्गदर्शन तत्त्वे अथवा रूपरेषा जाहीर केली गेली नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच साध्या यंत्रमागांचे आधुनिकीकरण करण्यासाठी ५० हजार रुपये खर्च असून तो यंत्रमागधारक करू शकत नसल्यामुळे ५० ते ६० टक्के सबसिडी शासनाने दिल्यास आधुनिकीकरण होऊ शकते, अशी मागणी केली.
दरम्यान मुख्यमंत्री चव्हाण यांनी वीजदर सवलतीचा थेट यंत्रमागधारकांना लाभ होईल असा निर्णय घेण्यासाठी राज्यातील तज्ञ लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाईल. तसेच सरकारी भूखंड म्हाडाला मोफत देऊन म्हाडामार्फत घरकुले बांधून दीर्घ मुदतीची कर्जात कामगारांना घरे देता येतील का याचीही चाचपणी करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
.