एका गाजलेल्या नाटकावरून चित्रपट करण्याची कल्पना चांगली असली, तरी रंगमंचाच्या चौकटीत भन्नाट वाटणारी ही कल्पना ७० एमएम पडद्यावर भरकटली आहे. धीमे कथानक, विनोदातील तोच तोचपणा आणि प्रेक्षकाला तीन तास खिळवून ठेवण्यात आलेलं अपयश यामुळे मराठी चित्रपटांना ‘खो’ देण्याच्या केदार शिंदे यांच्या प्रयत्नाचा ‘लोच्या झाला’ आहे.
दहा वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेलं ‘लोच्या झाला रे’ हे नाटक त्या वेळी प्रेक्षकांना खूपच आवडलं होतं. सिद्धार्थ जाधवचा आदिमानव, वाडय़ाचं नेपथ्य, संजय नार्वेकरने रंगवलेला श्रीरंग वगैरे सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. त्या वेळी प्रचलित नाटकांपेक्षा वेगळं असल्यानं या नाटकानं प्रेक्षकांना तोंडात बोटं घालायला लावली होती. दहा वर्षांनंतर याच नाटकावर आलेला चित्रपट मात्र प्रेक्षकांना कपाळावर हात मारून घ्यायला भाग पाडेल.
श्रीरंग देशमुख (भरत जाधव) हा तरुण शाळामास्तर सगळ्यांकडून शिव्या, टक्केटोमणे खाऊन पिचला आहे. एवढय़ात त्याची बदली झाल्याचे आदेश मुख्याध्यापक त्याच्या हातावर टेकवतात. श्रीरंग आपल्या गावात आणि मुख्य म्हणजे आपल्या पूर्वजांच्या वाडय़ात येतो आणि तिथे मेहता (उदय टिकेकर) या बिल्डरचा स्थानिक गुंड पक्या (कमलाकर सातपुते) त्याची वाटच बघत असतो. ‘वाडा सोड, नाहीतर जिवाला मुकशील’ अशी धमकी देऊन पक्या जातो. त्याच रात्री श्रीरंगच्या सात पिढय़ांचा इतिहास त्याच्या हाती पडतो आणि एकामागोमाग एक सात पूर्वज वाडा वाचवण्यासाठी खाली उतरतात. अशा गोष्टीचा शेवट कसा होईल, हे वेगळं सांगायला नको. या कथानकात मध्येच वाडय़ाचा केअरटेकर घाटपांडे (विजय चव्हाण) आपली सातवी मुलगी सुमन (प्राजक्ता माळी) हिला श्रीरंगच्या गळ्यात बांधण्याचा प्रयत्न करतो आणि श्रीरंग व सुमन यांच्या प्रेमकहाणीत चित्रपटातील काही अमूल्य वेळ बरबाद होतो. नाटकावरून चित्रपट करताना केदार शिंदे यांनी अनेक गोष्टींना फाटा देण्याची गरज होती. मात्र चित्रपटाच्या तथाकथित सर्वमान्य कथानकाची गरज भागवण्यासाठी त्यांनी केअरटेकर, त्याची मुलगी, श्रीरंग आणि तिची प्रेमकहाणी, सातही पूर्वज लग्नासाठी श्रीरंगची करत असलेली मनधरणी वगैरे फिजुल गोष्टी टाकल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळी कथा भक्कम नसते, त्या वेळी हातात असलेल्या हुकमाच्या एक्क्यांचा अतिरिक्त वापर करावा लागतो. भरत आणि सिद्धार्थ या दोघांमधील दृश्ये आणि त्यांच्यातील गोंधळ बराच काळ सुरू राहतो. इतर पूर्वजांच्या मानाने आदिमानव (सिद्धार्थ जाधव) आणि पेशवाईतील नाचणारी बाई (क्रांती रेडकर) या दोघांकडे दिग्दर्शकाचा कल जास्त असल्याचं जाणवतं.
आपल्या पूर्वजांनी खूप काही करून ठेवलं आहे. प्रश्न आहे तो, ‘आपण काय करणार?’ हा! या वाक्याचा आधार घेत दिग्दर्शकाने प्रसिद्धी केली. मात्र चित्रपटात श्रीरंग स्वत: काहीच करत नाही. त्याचे पूर्वजच त्याच्याकडून करवून घेतात. इथेच चित्रपटाची हार आहे. चित्रपटातील संवादही अनेक एकांकिका स्पर्धामध्ये घासून गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे हे बोथट संवाद काळजात घुसत नाहीत. श्रीरंग सातही पूर्वजांना आजच्या वास्तवाची जाणीव करून देतो, हा प्रसंग तर अनेक एकांकिकांमध्ये तुकडय़ा तुकडय़ाने दिसतो. त्याचप्रमाणे ‘वडील लहानपणीच वारले, तर तुमचा जन्म कसा झाला?’ छाप विनोदांचाही चावून चावून चुथडा झाला आहे, हे दिग्दर्शकाच्या लक्षात न यावे, हीच खंत आहे. दिग्दर्शनातही केदार शिंदे यांनी फार काही कमाल केलेली नाही. त्यांच्या आधीच्या चित्रपटांमधील शैली आणि या चित्रपटाची शैली यात काहीच फरक नाही. चित्रपट थोडाफार पाहण्यासारखा झाला आहे, तो त्यातील ग्राफिक्सच्या वापरामुळे. पण हे ग्राफिक्सही प्रेक्षकाला कोणताही धक्का देत नाहीत. हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटांतील ग्राफिक्सना सरावलेल्या प्रेक्षकांना या ग्राफिक्समध्ये काहीच आश्चर्यकारक वाटत नाही. भिंतीतून घोडा येणे, ही एकमेव गोष्ट बघायला खूप मस्त वाटते. इतर ग्राफिक्स ठाकठीक आहेत.
‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातील संगीत दिग्दर्शकाच्या डोक्यातून (कानांतून?) बाहेरच पडलेलं नाही. चित्रपटातील गाण्यांवर त्या संगीताचा प्रभाव ठळकपणे जाणवतो. वास्तविक हा चित्रपट गाणीविरहितही चालला असता. त्यातही गांधीवादी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील कार्यकर्ता, अशोकाच्या सैन्यातला शिपाई अशा भूमिकांतील लोकांना चक्कगाण्याच्या तालावर नाचायला लावणेही सामान्य मनाला पटत नाही. अभिनयाच्या बाबतीत भरत जाधवने बरं काम केलं आहे. त्याचा गरीब, भाबडा लूक ‘श्रीमंत दामोदरपंत’ या नाटकापासून तसाच आहे. त्यामुळे त्याच्या वाटय़ाला वेगळं काहीच आलेलं नाही. सिद्धार्थ जाधवने आदिमानवाच्या भूमिकेत जमेल तेवढा चावटपणा करून घेतला आहे. क्रांती रेडकरनेही बऱ्यापैकी चांगलं काम केलं आहे. केअरटेकरच्या भूमिकेत विजय चव्हाण यांनी थोडी गंमत आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण ही पठडीतली भूमिका असल्याने त्यात नावीन्य नाही. उदय टिकेकर यांनी रंगवलेला मेहता बिल्डर खूपच चांगला उभा राहिला आहे. प्राजक्ता माळीच्या भूमिकेला फार भावच नाही. त्यामुळे तिची सुमनही ठाकठीक झाली आहे. ग्राफिक्सचा वापर, नाटकाच्या कथानकावर आधारित चित्रपट, भरत, सिद्धार्थ, क्रांती असे तगडे कलाकार या सर्वाचं संचित फार काही चांगलं नाही. रंगमंचाच्या चौकटीत रंगलेलं हे नाटक कॅमेऱ्याच्या नजरेतून साफ गंडलं आहे.
शोभना देसाई प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘खोखो’
कथा व दिग्दर्शन – केदार शिंदे, पटकथा – केदार शिंदे, ओमकार दत्त, संवाद – केदार शिंदे, सिद्धार्थ साळवी, विजय पगारे, संगीत – शशांक पोवार, वैशाली सामंत, पाश्र्वसंगीत – सलील अमृते, संकलन – मनीष मिस्त्री, छायाचित्रण – सुरेश देशमाने, ग्राफिक्स – चेतन देशमुख, कलाकार – भरत जाधव, विजय चव्हाण, सिद्धार्थ जाधव, क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी, रेशम टिपणीस, उदय टिकेकर, कमलाकर सातपुते, वरद चव्हाण, वरुण उपाध्ये, घनश्याम घोरपडे, आनंदा कार्येकर, प्रशांत विचारे.