स्थापत्य कला अथवा ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणाऱ्या पुस्तकांमध्ये संबंधित ठिकाणी पर्यटकांना उपलब्ध असणाऱ्या सोयी-सुविधा तसेच इतर आवश्यक माहिती देण्याचा उपक्रम ग्रंथाली आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. दाऊद दळवी यांच्या ‘लेणी महाराष्ट्राची’ या पुस्तकाच्या सुधारित दुसऱ्या आवृत्तीद्वारे या योजनेचा प्रारंभ झाला असून अशाच प्रकारे मुंबई, कोकण, रायगड तसेच महाराष्ट्रातील निवडक ४० पर्यटनस्थळांची माहिती देणारी पुस्तके लवकरच प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी दिली. डिसेंबर महिन्यात ग्रंथालीतर्फे प्रकाशित होत असलेल्या पर्यटन विशेषांकात त्या त्या विभागातील लेखक-कवींचीही माहिती असेल, असेही त्यांनी सांगितले.
भारतातील एकूण १२०० लेण्यांपैकी ८०० लेणी महाराष्ट्रात आहेत. इसवीसनाच्या आरंभ काळी महाराष्ट्रात आलेल्या बौद्धधर्मीयांना सहय़ाद्रीच्या डोंगरदऱ्या आणि कातळलेणी खोदण्यास योग्य वाटल्या. त्यातूनच वास्तु-शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली लेणी साकारली. बौद्धांनंतर हिंदू तसेच जैनपंथीयांनीही महाराष्ट्रात लेणी खोदली. लाखो अनाम कलावंतांनी खोदलेल्या या लेण्यांची सचित्र माहिती अत्यंत रोचक शैलीत देणारे डॉ. दाऊद दळवी यांचे ‘लेणी महाराष्ट्राची’ हे पुस्तक अत्यंत वाचकप्रिय ठरले. शनिवारी या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे ठाण्यात प्रकाशन झाले. पुस्तकाच्या या सुधारित आवृत्तीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे प्रकाशित पर्यटनस्थळे दर्शविणारा नकाशा, राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचे मुंबईपासूनचे अंतर, पुस्तकात वर्णन केलेल्या लेण्यांजवळ उपलब्ध असलेली निवास व्यवस्था यांचा तपशील देण्यात आला आहे. लवकरच या पुस्तकाची इंग्रजी आवृत्तीही प्रकाशित केली जाणार आहे. ग्रंथांच्या माध्यमातून पर्यटन विकास साधण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यरत विद्यार्थ्यांचे ५० टुरिझम क्लब स्थापन केले आहेत. त्यातील प्रत्येक क्लबला विशिष्ट पर्यटनस्थळांची जबाबदारी देण्यात आली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे माजी संचालक डॉ. अ. प्र. जामखेडकर, निवृत्ती न्यायमूर्ती अनंत मेढेकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
आता पर्यटन विकासाला वाङ्मयीन संदर्भाची जोड
स्थापत्य कला अथवा ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणाऱ्या पुस्तकांमध्ये संबंधित ठिकाणी पर्यटकांना उपलब्ध असणाऱ्या सोयी-सुविधा तसेच इतर आवश्यक माहिती देण्याचा उपक्रम ग्रंथाली आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
First published on: 29-07-2014 at 06:10 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revised version of the leni maharashtrachi book