सोयाबीन पिकासाठी एका क्विंटलला ३३५० रुपये उत्पादन खर्च येतो , त्यात ५० टक्के नफा पकडून शासनाने सोयाबीनला किमान ५ हजार रुपये क्विंटल भाव द्यावा, या मागणीसाठी राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शहीद भगतसिंग यांच्या जयंतीदिनी म्हणजेच शनिवार, २८ सप्टेंबरला मोर्चे काढण्यात येतील, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निरीक्षक सत्तार पटेल यांनी दिली. संघटना राज्यातील ज्या ७ लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणार आहे त्यात बुलढाणा लोकसभा मतदार संघाचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
बुलढाणा जिल्हा घाटावरील कार्यकर्त्यांची बैठक निरीक्षक सत्तार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली १८ सप्टेंबरला येथे पार पडली. यावेळी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, बबन चेके, जनार्धन शिवणेकर, सतीश उबाळे, विजय गव्हाड, अ‍ॅड. शर्वरी तुपकर, चंद्रशेखर चंदन, संतोष राजपूत आदिंसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर   आयोजित    पत्रकार परिषदेत पटेल म्हणाले की, शेतकऱ्यांच्या   न्याय    हक्कासाठी    खासदार   राजू शेटृी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात   आंदोलनाचे   एक   व्यासपीठ    तयार   केले आहे. यावेळी रविकांत तुपकर यांनी राजीनामा देऊन मोकळ्या झालेल्या जिल्हा बॅंकेच्या संचालकांना ही दरोडेखोराचे टोळी असल्याचे संबोधून त्यांनी २०९ कोटी रुपयांचा बॅंकेवर दरोडा टाकल्याचे ते म्हणाले. आमदार राहुल बोंद्रे जर त्यांच्या नेत्यांना विचारल्याशिवाय राजीनामा देण्याचे नाही म्हणतात, तर त्यांनी बॅंकेचे कर्ज त्यांच्या नेत्यांना विचारून बुडवले काय, असा सवाल तुपकर यांनी केला. आपल्याला खासदार शेट्टी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा आदेश दिला तर आपण नक्कीच लढू, असे त्यांनी स्पष्ट करून, बुलढाण्यासह हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सांगली, बारामती व उस्मानाबाद या मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Story img Loader