विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळाच्या माध्यमातून महानगरपालिका शाळांचा कायापालट करावा व खेळात नैपुण्य मिळवून क्रीडा स्पर्धेत शाळेचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.
सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित ५१ व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. पार्क स्टेडिअमवर सुरू झालेल्या या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान महापौर अलका राठोड यांनी भूषविले. या वेळी व्यासपीठावर पालिकेतील विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण मंडळाचे सभापती प्रा. व्यंकटेश कटके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
या क्रीडा स्पर्धेत महापालिका व खासगी मान्यताप्राप्त शाळांतील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थी खेळाडूंनी सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
पालिका शाळांचा घसरत चाललेला शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण मंडळाच्या पदाधिकारी तथा प्रशासनाने आणखी प्रयत्न करणे अपेक्षित असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी नमूद केले. तर महापौर अलका राठोड यांनी विद्याध्र्यानी खेळातून सांघिक भावना व वैयक्तिक खेळातून आत्मविश्वास निर्माण करावा, असे आवाहन केले. या वेळी रोहिणी तडवळकर यांनेही मनोगत मांडले. पर्यवेक्षक शिवाजी शेटे यांनी सूत्रसंचालन केले, तर नबीलाल शेख यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे उपसभापती गोवर्धन कमटम, नगरसेवक राजकुमार हंचाटे, नगरसेविका इंदिरा कुडक्याल, जगदेवी नवले, शिक्षण मंडळाचे सदस्य केदार मेंगाणे, दत्तात्रेय गणपा, जावेद खैरदी, संकेत पिसे, संध्या गायकवाड, जयवंत थोरात, राजा बागवान, अरुणा वर्मा, प्रशासनाधिकारी सत्यवान सोनवणे आदी उपस्थित होते.