शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी सोलापुरात असताना त्यांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमध्ये रिव्हॉल्व्हर बाळगून फिरताना एका शिवसैनिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
भागवत जोगदनकर असे त्याचे नाव आहे. सकाळी उद्धव ठाकरे हे चार हुतात्मा पुतळ्याजवळील हॉटेल सिटी पार्कमध्ये उतरले होते. त्या वेळी हॉटेल व परिसरात शेकडो शिवसैनिकाची गर्दी उसळली होती. त्या वेळी हॉटेलमध्ये व्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची यंत्रणा मोठय़ा प्रमाणात तैनात होती.मात्र याचवेळी भागवत जोगदनकर हा स्वत:जवळ रिव्हॉल्व्हर बाळगून फिरताना आढळून आला. सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या नजरेस आल्यानंतर त्यांनी तत्काळ जोगदनकर याच्या ताब्यातून रिव्हॉल्व्हर काढून घेतली. या वेळी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे होत्या. त्यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले. सदर रिव्हॉल्व्हर वापरण्याचा जोगदनकर यांच्याकडे परवाना असल्याचे सांगण्यात आले. परंतु व्हीआयपींच्या भेटीप्रसंगी रिव्हॉल्व्हर घेऊन बाळगण्याचे कारण पोलिसांनाही उलगडले नाही.

Story img Loader