ठाणे जिल्हा हा तांदूळ उत्पादनासाठी आघाडीवर आहे. जिल्ह्य़ात सव्वा लाख मेट्रिक टन तांदूळ उत्पादित होत असून या सर्व तांदळावर प्रक्रिया करून तो मुंबईत विक्रीसाठी पाठविण्यास सरकार प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी राइस मिल चालकांना आर्थिक मदत किंवा त्या मील भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार शासन करीत असल्याची माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे जिल्यातील शेती व्यवसायाचा आढावा पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन घेतला. त्याच बरोबर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मुंबईत मोठय़ा प्रमाणात लागणारा तांदूळ हा पंजाब व इतर प्रातांतून आणला जातो. त्याऐवजी बासमती तांदूळ वगळता ठाणे जिल्ह्य़ात ३९ प्रकारच्या चांगल्या तांदळाचे उत्पादन होते. त्यामुळे ठाणे जिल्हयातील राइस मील भाडेतत्त्वावर घेऊन किंवा नवीन राइस मिल सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याचा शासन विचार करीत आहे. या मोसमात तांदळावर प्रक्रिया करून हा तांदूळ मुंबईत पाठविण्याची सरकारची योजना असल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारने वेळेवर खत उपलब्ध करून दिल्यामुळे यावर्षी कुठेही खतावरून आंदोलन झाले नाही. त्याचप्रमाणे यावर्षी खतामुळे उत्पादन वाढल्याचा दावा त्यांनी केला. ठाणे जिल्हयातील शहरीकरणामुळे येथील शेतीउद्योगाकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली त्यांनी दिली.
ठाणे जिल्ह्य़ात काँग्रेसची गंभीर परस्थिती आहे. पक्षाची बाजू कमकुवत आहे. मुळात कार्यकर्ते तळागाळापर्यंत पोहचत नाही. वास्तवाचे भान ठेवून बोलत नाहीत. विकासात्मक विश्व घेऊन नागरिकांना भेटत नाहीत. त्यामुळे हा पक्ष वाढू शकला नाही अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे संर्पकमंत्री असलेल्या पाटील यांनी दिली. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर शेजारीच बसले होते. यावेळी त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. लोकसभा निवडणुकी अगोदर ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
पुणे, नागपूरमध्ये सुरू झालेली थेट भाजीपाला पणन योजना या महिन्यात मुंबईत सुरू केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत ताजी आणि स्वस्त भाजी मिळू शकणार आहे. त्यासाठी बचत गट, सहकारी गृहनिर्माण संस्था, सेवाभावी संस्था यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यासाठी प्रि कुलिंग व्हॅन घेण्यासाठी सबसिडी दिली जाणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना घरपोच भाजी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader