ठाणे जिल्हा रिक्षाचालक-मालक संघटनेच्या वतीने मंगळवारी दिघा येथे रिक्षाचालक समस्य निवारण जाहीर सभा अयोजित करण्यात आली होती. खासदार संजीव नाईक आणि आमदार संदीप नाईक यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून राजकीय भाषणेही ठोकली. मात्र हातावर पोट भरणाऱ्या गरीब रिक्षाचालकांच्या जाहीर सभेत समस्यांवर चर्चासत्र करण्याऐवजी चक्क धम्माल वाद्यवृंदाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. आयोजक नगरसेवक नवीन गवते यांच्या या प्रतापामुळे समस्या मांडण्यासाठी आलेल्या रिक्षाचालक-मालकांना आल्यापावली हात हलवत परत जावे लागले.
आजमितीस ठाणे-बेलापूर मार्गावर हजारो रिक्षा धावतात. रिक्षाचालकांच्या समस्यांची सोडवणूक व्हावी यासाठी ठाणे रिक्षाचालक-मालक संघटना कार्यरत असून ऐरोली-दिघा परिसरातील रिक्षाचालक- मालकांच्या समस्यांच्या निवारणासाठी आयोजक नगरसेवक नवीन गवते व संघटनेचे उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी जाहीर सभा आयोजित केली होती.
या सभेला प्रमुख अतिथी म्हणून खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक यांनी हजेरी लावली. आगामी लोकसभा व पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रिक्षाचालकांच्या समस्यांवर भाष्य करण्याऐवजी दिघा रेल्वे स्थानक, ठाणे-बेलापूर रस्ता, कल्याण-वाशी रेल्वे मार्ग, अद्ययावत नवी मुंबई महानगरपालिका या आपल्याच विकासाचा पाढा खासदार संजीव नाईक यांनी वाचला, तर आमदार संदीप नाईक यांनी आयोजकांचे भरभरून कौतुक केले.
ऐरोली, दिघा मार्गावरील रिक्षाचालक-मालकांना नादुरस्त रस्ते, खड्डेमय रस्त्यांमुळे होणारे अपघात, बंद पडलेले सिग्नल, सीएनजी गॅसचा तुटवडा, शेअर रिक्षाच्या भाडय़ात वाढ करणे, रिक्षांना मीटर बसवण्याऐवजी आरटीओकडे घालावे लागणारे हेलपाटे, रिक्षाचालकांची मालकांकडून होणारी पिळवणूक, आरटीओकडून न मिळणारे सहकार्य, नवे परवाने आदी महत्त्वपूर्ण विषय चर्चिले जातील. किमान सुरू असणाऱ्या अधिवेशनात आमदार आपली भूमिका पोटतिकडीने मांडतील, अशी अपेक्षा होती, मात्र केवळ राजकीय भाषण, स्वागत समारंभ आणि नंतर या ठिकाणी धम्माल वाद्यवंृदाच्या कार्यक्रमाचा बार उडवून मूळ प्रश्नालाच बगल दिली.
अधिकाऱ्यांना निमंत्रणच नाही
विशेष म्हणजे रिक्षाचालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वाहतूक शाखेच्या एकाही अधिकाऱ्यास निमंत्रणच देण्यात आले नव्हते. तसेच भररस्त्यांवर संध्याकाळच्या वेळी झालेल्या या कार्यक्रमाने नागरिकांना गर्दीचा सामना करावा लागला, तर रिक्षा स्टॅण्डवर रिक्षा नसल्याने चाकरमान्यांना नाहक त्रास सोसावा लागला.
संग्रहित लेख, दिनांक 28th Feb 2014 रोजी प्रकाशित
जाहीर सभेत समस्या निवारणाऐवजी वाद्यवृंदाचा बार
ठाणे जिल्हा रिक्षाचालक-मालक संघटनेच्या वतीने मंगळवारी दिघा येथे रिक्षाचालक समस्य निवारण जाहीर सभा अयोजित करण्यात आली होती.
First published on: 28-02-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw driver owner assembly turn into musical event