कोल्हापुरातील रिक्षाचालकांच्या बेमुदत बंद प्रश्नी उद्या बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी मी चर्चा करणार आहे. शासनाने या प्रश्नातून मार्ग काढला नाही, तर भाजपा-शिवसेना युतीचे आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाचे कामकाज बंद पाडतील, अशी माहिती भाजपाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. दरम्यान, रिक्षाचालकांचा बेमुदत बंद आज दुसऱ्या दिवशी कायम राहिला.
मध्यवर्ती बसस्थानकाजवळील रिक्षा थांब्याजवळ रिक्षा संघर्ष समितीच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. आमदार पाटील तसेच ब्लॅक पँथरचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी येथे येऊन रिक्षाचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. आमदार पाटील यांनी रिक्षाचालकांच्या आंदोलनात स्वत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी एक महिन्यापूर्वी ई-मीटर बसविण्यात आलेली एक रिक्षा सादर करण्यात आली. या रिक्षाचे मीटर व्यवस्थित चालत नसल्याने रिक्षाचालक व ग्राहकांमध्ये होणाऱ्या वादावादीची माहिती देण्यात आली. या वादातून रिक्षाचालकांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार दाखल करूनही त्याची दखल न घेतल्याने संताप व्यक्त करण्यात आला. घाईगडबडीने ई-मीटरची सक्ती केल्यामुळे निर्माण होणाऱ्या वादाला जबाबदार कोण असा प्रश्नही या वेळी रिक्षाचालकांनी उपस्थित केला.