रिक्षाच्या ई-मीटरचा आर्थिक फटका ग्राहकांना कसा बसू शकतो, याचा कटू अनुभव बुधवारी प्रादेशिक परिवहन विभागाच्या विशेष निरीक्षकांनाच आला. अर्धा किलोमीटर रिक्षा धावल्यानंतर त्याचे भाडे ई-मीटरवर चक्क १ हजार ११४ रूपये इतके दाखविण्यात आले. यामुळे अधिकाऱ्यांसह रिक्षाचालक चाट पडले.
कोल्हापुरातील रिक्षाचालकांचे ई-मीटरच्या विरोधात गेले तीन दिवस बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे. ई-मीटरचा फटका कसा बसू शकतो, याचे प्रात्यक्षिकच रिक्षा संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी दाखविले. समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विशेष निरीक्षकांना एकनाथ एकबोटे यांच्या मालकीच्या एक वर्षांपूर्वी घेतलेल्या एमएच ०९-क्यू-७९२७ या ई-मीटर असलेल्या रिक्षातून प्रवास करण्यास सांगितले. त्यावेळी फक्त अर्धा कि.मी.अंतर कापल्यानंतर या ई-मीटरवर १ हजार ११४ रूपये इतके भाडे दाखविण्यात आले. व त्यावेळी या मीटरला खात्याने लावलेले सील हे सुस्थित होते, असे निदर्शनास आले.हा प्रकार पाहून अधिकारीसुध्दा चक्रावून गेले. त्यामुळे रिक्षाचालकांनी ई-मीटरची सक्ती कशी चुकीची आहे,हे दाखवून ई-मीटर रद्द करावे, अशी मागणी केली.    
रिक्षामधील जुन्या मीटरमध्ये रिक्षा व्यावसायिक फेरफार करतात व प्रवाशांची लुबाडणूक करतात, असे म्हणून राज्य शासनाने महापालिका व क वर्ग नगरपालिका यांच्या हद्दीमध्ये ३ मीटरची सक्ती केली आहे. गेले वर्षभर राज्यामध्ये विविध ठिकाणी ही ई-मीटर सदोष आहेत व त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे, असे पुरावे देऊन सिध्द केले आहे. तरी देखील शासन आपल्या निर्णयावर ठाम आहे. शासनाने ही भूमिका बदलावी, अशी मागणी रिक्षाचालकांकडून होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw e meter showed extra bill to transport inspector
Show comments