त्याच प्रवासासाठी या कर्मचाऱ्यांना १७ रूपयांपासून ३९ रूपये मोजावे लागत आहेत. एमआयडीसीतील अनेक लहान-मोठय़ा कंपन्यांमध्ये कल्याण, ठाणे, शहापूर, ग्रामीण भागातील युवक-युवती रोजंदारी कामासाठी येतात. त्यांना दररोज सव्वाशे ते दीडशे रूपये मजुरी दिली जाते. असे असताना डोंबिवली रेल्वे स्टेशन ते एमआयडीसीतील कंपनीपर्यंतच्या रिक्षा प्रवासासाठी ३५ ते ८० रूपयांचा खर्च सोसावा लागत असल्याने हे कामगार हैराण झाले आहेत.  रिक्षा भाडेवाढ झाल्यापासून अनेक कामगारांनी कंपनीतील रोजगार परवडत नाही, भाडे परवडत नाही म्हणून काम बंद केल्याची माहिती एमआयडीसीतील एका कंपनीच्या व्यवस्थापकाने दिली. तसेच काही कामगार कंपनी व्यवस्थापनाकडून दररोजचे जादा रिक्षा भाडय़ाची मागणी करत आहेत, असेही काही व्यवस्थापकांनी सांगितले. माफक वेतनात दर्जेदार कामे हे रोजंदारी कर्मचारी करतात. अशा रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांमध्ये तरूणी, महिलांचा सहभाग अधिक आहे. परंतु, रिक्षा भाडेवाढीमुळे दररोजचे जमा-खर्चाचे गणित जुळवणे या कामगारांसाठी कठीण होऊन बसले आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशन ते एमआयडीसीतील भागीदारी प्रवासाचे भाडे १४ रूपये ते २७ रूपये झाले आहे. थेट प्रवासाचे भाडे ३१ रूपये ते ६० रूपये झाले आहे. अनेक कंपनी मालक डोंबिवली रेल्वे स्टेशनहून थेट रिक्षेने कंपनीत जात असत. त्यांचीही थेट रिक्षेचे भाडे वाढल्याने अडचण वाढली आहे. एमआयडीसीतील प्रवासी, रोजंदारी कामगार यांचा विचार करून रिक्षा संघटनेचे नेते शेखर जोशी, संजय देसले, संजय मांजरेकर, राम काकडे या भागातील भागीदारी पध्दतीच्या रिक्षा भाडेवाढीच्या दराबाबत काही शिथीलता आणता येईल का याचा विचार करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw fare hike cause midc worker problem