नवी मुंबईतील वेगाने विस्तारणाऱ्या कामोठे शहरात राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरीधंद्यानिमित्त तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या नागरिक आणि विद्यार्थ्यांना वाहतूकीच्या योग्य व्यवस्थेअभावी चांगलेच त्रस्त केले आहे. स्थानिक रिक्षाचालकांनी सार्वजनिक परिवहन सेवेला जोरदार विरोध करीत ती बंद पाडल्यामुळे नागरिकाना केवळ रिक्षावरच अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे मुजोर रिक्षावाल्यांच्या मनमानी कारभाराला विरोध करून नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक परिवहन सेवा सुरू करण्याबाबत संबंधित प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी कामोठे येथील रहिवासी करू लागले आहेत.
कामोठय़ात मोठय़ा प्रमाणात नोकरदारवर्ग आहे. कामाधंद्यानिमित्त लोकलने मुंबई, ठाणे गाठण्यासाठी मानसरोवर आणि खांदेश्वर रेल्वेस्थानके उपयोगी पडतात. मात्र या रेल्वे स्थानकांपर्यंत येण्यासाठी नागरिकांना कुठलीही सार्वजनिक परिवहन सेवा उपलब्ध नाही. सिडकोने खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वेस्थानकांसमोर बस थांब्याचे नियोजन केले आहे. चकचकित रस्ते आणि बस डेपोची उभारणी येथे करण्यात आली आहे. मात्र रिक्षाचालकांच्या विरोधामुळे सिडकोने उभारलेली ही यंत्रणा आता धूळ खात पडली आहे.
नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार एनएमएमटी प्रशासनाने सुरूवातीच्या काळात येथे बससेवा सुरू केली. मात्र या बससेवेला स्थानिक तीन आसनी रिक्षाचालकांनी विरोध केला. एनएमएमटी प्रशासनाने याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. या भागात बससेवा सुरू करण्याविषयी समन्वयाच्या बठका घेऊनच हा प्रश्न सोडवू. याबाबत प्रवाशांचे मागणीपत्र आपल्या विभागाकडे येणे गरजेचे आहे, अशी भूमिका एनएमएमटीच्या व्यवस्थापकांनी घेतली आहे.
दरम्यान, वेगाने विस्तारणाऱ्या कामोठे परिसरात सार्वजनिक वाहतूकीची व्यवस्था निर्माण करणे स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र याबाबत कोणताही राजकीय पक्ष वा त्यांचे नेते तसेच स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन पुढाकार घेत नसल्यामुळे आम्हाला कोणी वाली नाही, अशी भावना मुंबई तसेच आजूबाजूच्या शहरांतून येथे राहणाऱ्या आलेल्या रहिवाशांच्या मनात निर्माण झाली आहे.
कामोठे शहरातून रोज नोकरीधंदा तसेच इतर कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांची संख्या १० हजाराच्या आसपास आहे. तर कामोठे परिसरात सुमारे ५०० रिक्षा आहेत. त्यामुळे केवळ ५०० रिक्षाचालकांच्या हितासाठी कामोठे शहरातील १० हजार प्रवाशांना रोज वेठीस धरले जात आहे. इतर कोणतीही सार्वजनिक परिवहन व्यवस्था नसल्यामुळे रिक्षाचालकांची मुजोरी निमूटपणे सहन करण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय नाही. शहरात आजही शेअर रिक्षा चालतात. स्थानिकांखेरीज अन्य व्यक्तींच्या रिक्षा शहरात फिरू देणार नाही, असा स्थानिक रिक्षाचालकांचा अलिखित नियम आहे. वाहतूक तसेच प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारीही या प्रश्नाकडे कानाडोळा करीत असल्यामुळे कामोठय़ातील रहिवाशांचा प्रवास त्रासाचा झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2014 रोजी प्रकाशित
मुजोर रिक्षावाल्यांचा कामोठय़ात बससेवेला विरोध
नवी मुंबईतील वेगाने विस्तारणाऱ्या कामोठे शहरात राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरीधंद्यानिमित्त

First published on: 16-01-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw in panvel opposes public transport