सलग पाच महिन्यांपासून दुष्काळ व पाणीटंचाईशी झुंजणाऱ्या मनमाडकरांना नुकत्याच सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे दिलासा मिळाला खरा, मात्र आता नळाद्वारे ते पाणी घराघरांत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून पालिकेने तातडीने नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे. सध्या शहराला २० ते २२ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची गरजही वाढत आहे. त्यामुळे पालिकेने मनमाडकरांना त्वरित पाणी कसे देता येईल, याची दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. पालखेड आवर्तनामुळे येवल्याची तहान काही अंशी भागणार आहे. नांदगावलाही पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चाराटंचाईमुळे दुग्ध व्यवसायाला उतरती कळा आली असून शेतकऱ्यांना आपली जनावरांची विक्री करणे भाग पडले आहे.
पाण्याच्या दुर्भिक्षामुळे टँकरची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सद्य:स्थितीत २३९ गावे व ६३८ वाडय़ा अशा ८७७ ठिकाणी २३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात तर टँकरग्रस्त गावे व वाडय़ांची स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे. या तालुक्यात टँकरच्या संख्येने अर्धशतक गाठले आहे. भूगर्भातील पाणी पातळी मोठय़ा प्रमाणात खाली गेली आहे. त्यामुळे विंधन विहिरी, विहिरींची पातळी खालावली असून अनेक ठिकाणी त्या कोरडय़ाठाक पडल्याचे दिसत आहे. चांदवड तालुक्यातील २३ गावे व २ वाडय़ांना १४ टँकरने, तर देवळा तालुक्यात १४ गावे व १६ वाडय़ांना १३ टँकरने पाणी दिले जात आहे. तसेच येवला तालुक्यात ४० गावे व २७ वाडय़ांना १७ टँकरने पाणी दिले जात आहे. ३९ गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. सहकारी संस्थांसह दानशूर व्यक्तीही पाणीपुरवठय़ासाठी पुढे सरसावल्या आहेत.
तालुक्यात पाणी व चाराटंचाईमुळे दुग्ध व्यवसायाला उतरली कळा आली असून, वाढत्या वीजभारनियमनामुळे अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. शिवारात ३०० फूट खोल ‘बोअर’ करूनही पाणी लागत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गावातील सार्वजनिक पाणीपुरवठय़ाच्या विहिरी आटल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. या व्यतिरिक्त अनेक गावांनी तात्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. शेतातील उभ्या पिकांना पाणी देऊन ती वाचविण्यापेक्षा मनाचा मोठेपणा दाखवत अनेकांनी सर्वसामान्यांना पाणी उपलब्ध करण्यास प्राधान्य दिले आहे. चाऱ्याची समस्या गंभीर बनल्याने शेतीला जोडधंदा म्हणून उभारी घेऊ पाहणाऱ्या दुग्ध व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. तालुक्यात दरवर्षी कांदा, भाजीपाला, मका, सोयाबीन, टोमॅटो आदी नगदी पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. या पिकांना जोडधंदा म्हणून शेतकरी गाई, म्हशी, शेळ्या आदी दुभती जनावरे पाळून दुग्ध व्यवसाय करतात. याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाला आर्थिक हातभार लागतो. मात्र दुष्काळामुळे चाराटंचाईचे संकट गडद बनले आणि हाती आलेली पिके पाण्याअभावी जळून गेली. चाऱ्याअभावी जनावरे सांभाळणे अवघड बनल्याने त्यांना बाजाराचा रस्ता दाखविण्याचा मार्ग शेतकऱ्यांनी पत्करला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा