० ‘कायमस्वरूपी हक्क’ आपल्याला विकल्याचा समित कक्कड याचा दावा
० केवळ एक वर्षांसाठीच हक्क दिल्याचे गायकवाड यांचे स्पष्टीकरण
एखाद्या गाजलेल्या कादंबरीवर चित्रपट येण्याची बातमी आली की, वादाला तोंड फुटलेच पाहिजे, असे काही विधिलिखित असावे. कारण लक्ष्मण गायकवाड लिखित ‘उचल्या’ या कादंबरीवर अनंत महादेवन चित्रपट तयार करीत असल्याची बातमी येऊन आठवडा उलटत नाही, तोच या कादंबरीवरून मराठी चित्रपट तयार करण्यासाठीचे कायमस्वरूपी हक्क गायकवाड यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्याला विकले असल्याचा दावा दिग्दर्शक समित कक्कड याने केला आहे. त्यामुळे या कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट बनवण्यासाठीच्या हक्कांवरून वाद उभा राहिला आहे. मात्र आपण समितला हे हक्क केवळ एक वर्षांसाठीच दिले होते, असे गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
दोन वर्षांपूर्वी लक्ष्मण गायकवाड यांच्याकडून आपण या कादंबरीचे ‘कायमस्वरूपी हक्क’ विकत घेतले होते. त्यासाठी त्यांना दोन लाख रुपयेही दिले होते. याबाबतचा करारही आपल्याकडे आहे.
गेल्या वर्षी आपण या चित्रपटाचा मुहूर्तही केला होता. मात्र अचानक गायकवाड यांनी मराठी चित्रपटासाठीचे हक्क दुसऱ्याच निर्मात्याला विकले, असे समितने सांगितले. ‘हा करार रद्द करा. मी पैसे परत देतो’, असे सांगत सहा महिन्यांपूर्वी गायकवाड आले होते. मात्र आपण हा चित्रपट करण्याबाबत खूपच गंभीर होतो. त्यामुळे आपण त्यांना नकार दिला, असेही त्याने स्पष्ट केले.
याबाबत गायकवाड यांना विचारणा केली असता, मुळात आपण कक्कड यांना कायमस्वरूपी हक्क दिलेच नव्हते. मराठी चित्रपट तयार करण्यासाठी एक वर्ष आणि इतर भाषांसाठी दोन वर्ष एवढय़ाच कालावधीसाठी हे हक्क त्यांच्या ताब्यात होते, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे कराराची कोणतीही प्रत समित यांनी आपल्याला दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. समित यांनी केवळ मुहूर्त केला. पण संवाद कोण लिहिणार, काम कोण करणार याबाबत काहीच सांगितले नाही, असेही गायकवाड यांचे म्हणणे आहे.
ही तर शुद्ध फसवणूक – लक्ष्मण गायकवाड
आपल्या कादंबरीवर लवकरात लवकर चित्रपट बनला, तर चळवळीसाठी फायद्याचे ठरेल, या हेतूने आपण समित यांना हक्क दिले होते. मराठी चित्रपट बनविण्यासाठीचे हे हक्क केवळ एका वर्षांपुरते मर्यादित होते. त्यानंतर आपण त्यांनी दिलेले पैसे परत करण्याची तयारीही दाखवली होती. आता तर समित केवळ कराराच्या छायाप्रती दाखवत आहेत. माझ्यासारख्या लेखकाची ही फसवणूक आहे.
हाव बरी नाही – समित कक्कड
एकाच कादंबरीसाठी दोन निर्मात्यांकडून पैसे मिळत असल्याचे पाहून लक्ष्मण गायकवाड यांनी हा प्रकार केला असावा. मात्र मी चित्रपटाचे काम सुरू केल्यानंतर गायकवाड यांनी दुसऱ्या निर्मात्याला हक्क विकणे योग्य नाही. या चित्रपटात जितेंद्र जोशी प्रमुख भूमिका करणार होता. ऑगस्टपर्यंत चित्रीकरणासाठी त्याने तारखाही ठेवल्या होत्या. मी त्याला आगाऊ पैसेही दिले होते. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी तो २५ किलो वजन कमी करणार होता. चित्रपटाचे पोस्टरही तयार केले होते. मात्र लेखकाची हाव नडली आहे. कराराची प्रत त्यांना दिली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हे निखालस खोटे आहे.