महापालिकेच्या महिला व बालकल्याण सदस्य निवडीचे अधिकार महापौर कांचन कांबळे यांना देण्याचा ठराव शनिवारी महासभेत घेण्यात आला. तसेच महापालिका क्षेत्रात चार प्रभाग समित्या नियुक्त करण्यास महासभेने मान्यता दर्शविली. महापौर श्रीमती कांचन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज महासभा झाली.
महिला व बालकल्याण समिती नियुक्त करण्याबाबतचा विषय विषयपत्रिकेवर होता. या संबंधी सदस्य नियुक्तीबाबत महापौरांना अधिकार देण्याचा ठराव करण्यात आला. या समितीमध्ये १६ सदस्य असून या सदस्यांची शिफारस गट नेत्यांनी महापौरांचेकडे करावयाची आहे. त्यानंतर महापौर या निवडी जाहीर करतील. पूर्वीप्रमाणेच सांगलीसाठी २, मिरज व कुपवाडसाठी प्रत्येकी एक अशा प्रभाग समित्या स्थापन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. शहरातील फेरीवाला-विक्रेते धोरण निश्चित करण्यासाठी हरकती व सुचना मागविण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला.
डिजिटल फलकामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचा मुद्दा काही सदस्यांनी यावेळी उपस्थित केला. या संदर्भात जाहिराती प्रसारित करण्यासाठी निश्चित धोरण महापालिकेने तयार करावे त्यासाठी सुचना व हरकती मागवाव्यात अशी भूमिका काही सदस्यांनी मांडली. कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या वकील संघटनेच्या मागणीला पािठबा दर्शविणारा ठराव करण्यात आला. गुंठेवारी भागात विकसित होत असलेल्या घरांसाठी पाणी पुरवठा करावा अशी मागणी करीत गुंठेवारी नियमितीकरणासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी या आमसभेत करण्यात आली.
महासभेत आजच्या चच्रेमध्ये सुरेश आवटी, किशोर जामदार, राजेश नाईक, शेखर माने, धनपाल खोत, मनुद्दीन बागवान, श्रीमती शुभांगी देवमाने, श्रीमती संगीता हारगे, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने आदींनी सहभाग घेतला होता.

Story img Loader