सोलापूरच्या कारागृहातील भेटीच्या वेळी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समक्ष तेथील दूरचित्रवाणी संच फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल यल्लप्पा बंदगी (वय ३९, रा. विनायकनगर, अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसर, सोलापूर) यास  न्यायदंडाधिकारी व्ही. के.जाधव यांनी दोन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आरोपी यल्लप्पा बंदगी हा घरफोडय़ांच्या गुन्ह्य़ात संशयित म्हणून अटक झाला होता. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती. त्यामुळे त्यास कारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान, ३० ऑक्टोबर २०१२ रोजी कैद्यांच्या तक्रारी असल्यास त्या जाणून घेण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांनी कारागृहास भेट दिली होती. या भेटीदरम्यान आरोपी बंदगी याने न्यायदंडाधिकाऱ्याच्या समोर तेथील दूरचित्रवाणी उचलला आणि खाली आपटून नष्ट केला. यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याने कैदी बंदगी याच्याविरुध्द जेलरोज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी न्यायदंडाधिकारी जाधव यांच्या समोर झाली. यात सरकारतर्फे अॅड. दातरंगे तर आरोपीतर्फे अॅड. अजमोद्दीन शेख यांनी काम पाहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा