वीज मीटरमध्ये तांत्रिक बिघाड करून ३ लाख ६३ हजार रुपयांची वीजचोरी केल्याबद्दल कोळगाव (ता. श्रीगोंदे) येथील क्रांती दूध डेअरीचा अध्यक्ष हेमंत भास्कर नलगे व संस्थेचा व्यवस्थापक अनिल चंद्रकांत लगड या दोघांना न्यायालयाने १ वर्ष सक्तमजुरी व ३ लाख ६५ हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. दंडातील ३ लाख ५० हजार रुपयांची रक्कम महावितरण कंपनीस देण्याचा आदेश आहे.
जिल्हा न्यायाधीश डी. एस. कदम यांनी आज या खटल्याचा निकाल दिला. महावितरण कंपनीतर्फे सुरेश लगड यांनी काम पाहिले तर दोन्ही आरोपींच्या वतीने वकील सतीशचंद्र सुद्रिक यांनी काम पाहिले. वीज कायदा कलम १३५ अन्वये नलगे व लगड या दोघांना प्रत्येकी १ वर्ष सक्तमजुरी व दोघांना मिळून ३ लाख ६५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरी तसेच कलम १३८ अन्वये दोघांना ६ महिने सक्तमजुरी व ४० हजार रु. दंड, दंड न भरल्यास ४० दिवस कैद अशी शिक्षा आहे.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिलीप भोळे यांनी दि. ३ जून २००६ रोजी पथकासह डेअरीवर छापा टाकून ही वीजचोरी पकडली होती. त्या वेळी वीज मीटर अत्यंत हळू चालत असल्याचे आढळले होते. मीटरची तांत्रिक तपासणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. छाप्याचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले होते, ते सुनावणीच्या वेळी न्यायालयात दाखवण्यात आले होते.

Story img Loader