कनिष्ठ अभियंत्याना कारणे दाखवा
रिझव्र्ह बँक चौकाला विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शहर काँग्रेसने महापालिका आयुक्तांना दिला. या प्रस्तावाला बहुजन समाज पक्षासह राष्ट्रीय मजदूर काँग्रसने विरोध केला आहे. महापालिकेत चौकाला नाव देण्यावरून पुन्हा नवा वाद सुरू होणार असल्याचे बोलले जात असताना एका चौकाला दोन नावाचा प्रस्ताव दिल्याबद्दल धरमपेठ झोनच्या कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे.
रिजव्र्ह बँकेसमोरील चौकाला अनौपचारिकपणे रिझव्र्ह बँक चौक असे संबोधले जाते. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमने विलासराव देशमुख यांचे नाव देण्यासंदर्भात उपमहापौरांना निवेदन दिले. त्यानंतर शहर काँग्रेस अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांना विलासराव देशमुख यांचे नाव नागपूर शहराच्या एका चौकाला देण्यात यावे, असे निवेदन दिले. दोनच दिवसांनी गुप्ता यांनी केवळ महापालिका आयुक्तांना रिझव्र्ह बँक चौकाला विलासराव देशमुख यांचे नाव देण्याबाबत निवेदन दिल्यावर आयुक्तांनी धरमपेठ झोनच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन एक प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. विलासराव देशमुख यांच्या नावाला विरोध नाही, मात्र रिझव्र्ह बँक चौकाला संविधान चौक असे नाव देण्यात यावे, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे किशोर गजभिये यांनी आयुक्तांकडे केली.
रिझर्व बँक चौकाला ‘संविधान चौक’ असे नाव देण्याचा प्रस्ताव चार महिन्यापूर्वी तयार केला होता. तो प्रस्ताव तयार असताना दुसरा प्रस्ताव विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेने कसा पाठवला असा प्रश्न गजभिये यांनी उपस्थित केला. एकाच चौकाला दोन वेगवेगळे नाव देण्याचा प्रस्तावामुळे शहरात शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात महापालिका आयुक्तांची आज भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आयुक्तांनी धरमपेठ झोनच्या कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस दिली असून त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे. रिझव्र्ह बँक चौकात विधानभवन आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळासुद्धा याच चौकात आहे. संविधानाला मानणारे याच चौकातून संवैधानिक मागण्यांसाठी आंदोलने करतात. शहरातील सर्वात मोठे कस्तुरचंद पार्क याच भागात आहे. महापालिकेने स्थापन केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शहरातील सर्वच पातळीवरील अनेक मान्यवर येत असतात. याच चौकाच्या मध्यभागी रस्ता रुंदीकरणापूर्वी राजमुद्रेची प्रतिकृती होती. ती अनेक वर्षांपासून गायब आहे. या चौकाचे ‘संविधान चौक’ असे नामकरण करण्यात यावे व अशोक स्तंभांकित राजमुद्रेची स्थापना करावी, अशी मागणी किशोर गजभिये यांनी केली.
रिझव्र्ह बँक चौकाच्या नामकरणाचा वाद
कनिष्ठ अभियंत्याना कारणे दाखवा रिझव्र्ह बँक चौकाला विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शहर काँग्रेसने महापालिका आयुक्तांना दिला. या प्रस्तावाला बहुजन समाज पक्षासह राष्ट्रीय मजदूर काँग्रसने विरोध केला आहे. महापालिकेत चौकाला नाव देण्यावरून पुन्हा नवा वाद सुरू होणार असल्याचे बोलले जात असताना एका चौकाला दोन नावाचा प्रस्ताव दिल्याबद्दल धरमपेठ झोनच्या कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे.
First published on: 09-09-2012 at 04:34 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rijarv bank shahar congress vilasrao deshmukhnames for road