कल्याण-डोंबिवलीतील मुजोर रिक्षाचालक आणि मीटरसक्तीला असलेला त्यांचा विरोध याबाबत येथील सर्वपक्षीय नेतेही तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. वृत्तपत्रातून या विषयी बातम्या प्रसिद्ध झाल्या की मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी या नेत्यांकडून थातूरमातूर नाटक केले जाते. पण मीटरसक्ती लागू होण्यासाठी एकाही राजकीय पक्षाने अथवा त्यांच्या नेत्याने ठोस आणि सातत्याने प्रयत्न केलेले नाहीत.
मोटारवाहन कायद्यानुसार रिक्षाचालकाने मीटर टाकणे आवश्यक असतानाही येथे गेली अनेक वर्षे मीटर न टाकता रिक्षाचालक प्रवाशांची लुबाणूक करत आहेत. एक-दोन वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून प्रवाशांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. ‘मनसे’च्या आमदारांनी मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आणि मीटरसक्तीसाठी आंदोलन केले. ‘भाजप’च्या स्थानिक आमदारांनी याविषयी मोठे फलक लावले. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी मात्र मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात अपवाद वगळता फारसे प्रयत्न केले नाहीत.
काही महिन्यांपूर्वी पनवेल येथेही मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात आणि मीटरसक्तीसाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला स्थानिक आमदारांचा पाठिंबा होता. कल्याण-डोंबिवलीत मात्र याच्या उलट परिस्थिती आहे. मुठभर मुजोर रिक्षाचालकांची बाजू घेण्यात सर्वपक्षीय नेते धन्यता मानत आहेत. त्यासाठी लाखो प्रवाशांना त्यांनी वाऱ्यावर सोडले असल्याने सर्वपक्षीय नेते आणि रिक्षाचालक-मालक संघटना व त्यांच्या नेत्यांचे नेमके काय साटेलोटे आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता असली तरी प्रवाशांना नाडणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात महापालिकेतील युतीच्या नगरसेवकांनीही ठोस प्रयत्न केले नाहीत. गोग्रासवाडीसह अन्य काही भागात सुरू असलेली महापालिकेची परिवहन सेवा रिक्षाचालकांनी दंडेली करून बंद पाडली. मात्र त्याविरोधात अद्याप काही झालेले नाही. रिक्षाचालकांची मुजोरी मोडून काढायची असेल तर कल्याण-डोंबिवलीच्या विविध भागात महापालिकेची परिवहन सेवा तातडीने सुरू करण्याची गरज आहे. मात्र गेल्या काही वर्षांत सत्ताधाऱ्यांकडून त्यासाठीही ठोस प्रयत्न झालेले नाहीत. डोंबिवली पश्चिमेतील पं. दीनदयाळ मार्ग, मच्छिमार्केट समोरील रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्याचा मार्ग, रेतीभवन येथे रिक्षा वेडय़ावाकडय़ा उभ्या केल्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. पण त्या विरोधातही एखादा नगरसेवक रस्त्यावर उतरला असल्याचे कधीही दिसून आलेले नाही.
‘मनसे’कडून कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. अन्य सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते व नगरसेवक हे कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालक-मालक संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे ही मंडळी रिक्षाचालकांच्या विरोधात मीठाची गुळणी धरून बसणार हे उघड सत्य आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा