लोकशाहीतील मतदारराजाने मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशिनमधील आपल्याच उमेदवाराच्या नावापुढील कळ दाबण्यासाठी गुरुवारी पनवेलमधील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली होती. गेल्या २० दिवसांपासून आपलाच उमेदवार जनतेच्या सर्व समस्या कशा सोडवू शकतो, हे पटवून देणारे राजकीय पक्षांचे प्रमुख आज मतदारांना शेवटच्या क्षणापर्यंत नेमक्या याच क्रमांकासमोरील कळ दाबण्यासाठी साकडे घातल होते. मतदारराजाला आज घरापासून केंद्रापर्यंत नेण्यासाठी शहरांमध्ये तीनआसनी रिक्षा, मारुती इको, खेडय़ांमध्ये मिनीडोअरची (सहाआसनी रिक्षा) सोय करण्यात आली होती. कडक उन्हात मतदारराजा घराबाहेर पडल्याने अनेकांनी या राजाच्या दिमतीला थंडगार लस्सी आणि शीतपेयाची सोय केल्याचे पाहायला मिळाले. पनवेल तालुक्यात अनेक ठिकाणी काही मतदारांच्या घरी बुधवारी रात्रीपर्यंत कपबशी पोहचल्याने अनेकांनी आज वोट फोर नोट ही संकल्पना स्वीकारून मतदान केल्याचे बोलले जात आहे. मात्र लोकसभेच्या या निवडणुकीचे विशेष ठरले ते सरकारी मतदारांचे स्लिप देणारे सकरारी टेबल. निवडणूक अधिकारी सुदाम परदेशी यांच्या नेतृत्वाखील राबविण्यात आलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे लोकसभेच्या निवडणुकीत दुपारी १ वाजेपर्यंत सर्वाधिक ३० टक्के मतदान झाले होते. यामध्ये पुरुष मतदार ३०.४८ आणि महिला मतदार ३२.१० आहेत. पोलिसांनी लोकसभेच्या निवडणूकीत राजकीय पक्षांचे बुथचे १०० मिटर अंतराच्या बाहेर लावल्याने मतदान केंद्राजवळची पांढऱ्या कपडय़ांची गर्दी कमी प्रमाणात पाहायला मिळाली. मात्र पोलिसांच्या या सतर्कतेमुळे पनवेलमध्ये कोणत्याही केंद्रावर वाद झाल्याची घटनेची नोंद झाली नाही. शहरांमधील अनेक उच्चशिक्षित मतदारांचा गट यावेळी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी उतरलेला पाहायला मिळाला. शहरांसहीत खेडय़ांमध्येही निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमातून केलेल्या प्रचारामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे पाहायला मिळाले. भाऊंच्या प्रचारार्थ काही कार्यकर्त्यांनी रात्रीच्या अंधारात कळंबोली येथील सेक्टर ५ येथे प्रतिवोट ५०० रुपयांचे वाटप होत असल्याची माहिती पोलिसांना एका विरोधकाने दिल्यानंतर या कार्यकर्त्यांचा पाठलाग पोलिसांनी केला. मात्र पोलिसांच्या हाती नोट किंवा कार्यकर्तेही लागले नाहीत. त्यानंतर मात्र खबरदारी घेत वोट फॉर नोटचे तंत्र थांबल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे मतदारांना पैसे वाटण्याच्या वावटळीने अनेकांनी राजकीय पक्ष कार्यालयात धाव घेतली. मात्र येथे समयसूचकतेचे तंत्र वापरून आपल्याला कोणताही निधी आला नसल्याचे मतदारांना सांगण्यात आले. अनेक बडय़ा नेत्यांनी स्थानिक राजकीय पक्ष कार्यालयातून फोन येत असल्याने आणि त्यावर पैशांची मागणी करत असल्याने आपले फोन स्विच ऑफ करुन ठेवण्याची पाळी या बडय़ा नेत्यांवर आली. दुपारनंतर राजकीय बुथच्या टेबलवर काम करणाऱ्या प्रतिनिधींसाठी व्हेज बिर्याणीची सोय करण्यात आली होती. मात्र सतत चार दिवसांपासून ईव्हीएम मशीन, मतदानाच्या केंद्र सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या जेवणाचे विशेष प्रबंध काही केल्याचे दिसत नव्हते. काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पोलिसांना वडापाव आणून देताना दिसले.
उमेदवारांपेक्षा
रामशेठ यांच्या फोटोची चर्चा
लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी कॉंग्रेसचे नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर हे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांच्या घरात बसून शिवसेनेला मदत करा, हा संदेश पसरविणारा एक फोटो व्हॉट्सअॅप वर पसरविण्यात आला. लोकसभेच्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्या चर्चेपेक्षा दिवसभर रामशेठ यांच्या या फोटोची चर्चा अधिक झाली. याबाबत रामशेठ ठाकूर यांना विचारले असता, काही दिवसांपूर्वी मी खारघर शहरात एका ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी गेलो असता तिकडे या संबंधित शिवसैनिकाने आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे त्यांच्याकडे गेलो होतो. मात्र त्यावेळच्या घरातील फोटो हे महाशय अशा पद्धतीने वापरतील, असे आपल्याला ठाऊक नव्हते. मी अनेकांच्या दु:खाच्या वेळी त्यांच्या घरी दुखवटय़ासाठी जातो, काही नेतेही माझ्या घरी अशावेळी पाय लावतात. मात्र विरोधक स्तर सोडून प्रचार करतील हे वाटले नव्हते असे ठाकूर यांनी लोकसत्ताला सांगितले.
मतदारांच्या दिमतीला रिक्षा, अन् जोडीला थंडपेयाची सोय
लोकशाहीतील मतदारराजाने मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशिनमधील आपल्याच उमेदवाराच्या नावापुढील कळ दाबण्यासाठी गुरुवारी पनवेलमधील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली होती.
First published on: 18-04-2014 at 06:57 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rikshaw and colddrinks for voters on election day