नवीन पनवेल शहरातील प्रवाशांच्या तुलनेत कामोठे, खांदा कॉलनीतील प्रवासी सुखी आहेत, असे बोलण्याची वेळ आता आली आहे. आरटीओतील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नवीन पनवेल शहरातील प्रवाशांसाठी दहा वर्षे उलटूनही शेअर रिक्षा सुरू होऊ शकल्या नाहीत. लोकल गाठण्यासाठी आणि घरी परत येताना चाकरमान्यांना आजही रिक्षाचालकांच्या मनमानीला सामोरे जावे लागत आहे.  रिक्षाचालकांकडून सुरू असलेल्या लूटमारीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष पसरला आहे.
खांदेश्वर आणि कामोठे शहरातील प्रवाशांना रेल्वेस्थानक गाठण्यासाठी सात रुपये ते दहा रुपयांचा खर्च शेअर रिक्षांच्या माध्यमातून करावा लागतो. नवीन पनवेलमधील प्रवाशांना मात्र ३० ते ५० रुपये मोजावे लागत आहेत. रेल्वेस्थानक गाठण्यासाठी दुचाकी हवी, नाही तर तीस रुपये मोजण्याची तयारी असायला हवी. अशी स्थिती नवीन पनवेलकरांची झाली आहे. या परिसरात अजूनही शेअर रिक्षा धावत नसल्याने अनेकांना लोकल पकडण्यासाठी पायपीट करावी लागते. आरटीओचे वाहतूक आणि वाहनांचे नियम नवीन पनवेल परिसरात पोहोचू न शकल्याने ही वेळ प्रवाशांवर आली आहे. रिक्षाचालकांवरील अंकुश आरटीओने गमावल्याने या परिसरात रिक्षा मीटरप्रमाणे नाही तर किमान शेअर रिक्षा तरी सुरू करा, अशी कैफियत मांडण्याची वेळ नवीन पनवेलकरांवर आली आहे.
लोकप्रतिनिधींकडून प्रवाशांना परिवर्तनाची अपेक्षा
प्रवाशांच्या पायाभूत सुविधांसाठी एकही राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी प्रयत्न करताना दिसत नाहीत. तीन आसनी रिक्षा ही सोय की वाटमारीचे साधन, असे बोलण्याची वेळ या परिसरातील नागरिकांवर आली आहे. विशेष म्हणजे नवीन पनवेल शहरातून पनवेल नगरपालिकेच्या नगराध्यक्ष चारुशीला घरत आणि नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांना मतदारांनी आपल्या समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी निवडून दिले आहे. या दोन्ही लोकप्रतिनिधींकडून प्रवाशांना परिवर्तनाची अपेक्षा आहे.
आरटीओकडून  पुरस्कर्त्यांचा शोध
या संदर्भात आरटीओचे उपप्रादेशिक अधिकारी नंदकिशोर नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नवीन पनवेल शहरात आरटीओने आखून दिलेल्या दराप्रमाणे तीन आसनी रिक्षांमधून शेअर वाहतूक करावी, यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत. शेअर दरांचे फलक प्रसिद्ध करण्यासाठी आरटीओला पुरस्कर्ते मिळत नाहीत. त्यामुळे दरफलक लावले गेले नाहीत. येत्या पंधरा दिवसांनंतर नवीन परमीटचे काम संपल्यानंतर नवीन पनवेल शहराकडे आम्ही लक्ष वळवून येथील तीन आसनी रिक्षा शेअर दराप्रमाणे चालविण्यास भाग पाडूअसे त्यांनी सांगितले.

Story img Loader