डोईवर बरसणाऱ्या आषाढ धारात चिंब होत हजारो वारकरी-भाविकांच्या उपस्थितीत शुक्रवारी पुईखडी येथे आषाढी एकादशीनिमित्त नयनरम्य रिंगण सोहळा पार पडला. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे माउलीच्या दर्शनासाठी आज दिवसभर गर्दी होती. दरम्यान, शहरातही आज विठ्ठलमंदिरात आषाढी एकादशीनिमित्त माउलींचा जयघोष होत राहिला.    
नंदवाळ येथे आषाढी एकादशीचा सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा होतो. काल करवीर नगरीत नगरप्रदक्षिणा परीक्षण सोहळा पार पडला. शुक्रवारी सकाळी ७ वाजता मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात पालखीचे पूजन झाले. भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ चव्हाण, किशोर चव्हाण, दीपक गौड यांच्या हस्ते आरती झाली. पालखीचे पूजन झाल्यानंतर ती बिनखांबी गणेश मंदिर, उभा मारूती चौक, जुना वाशीनाका,सानेगुरूजी वसाहतमार्गे पुईखडीकडे मार्गस्थ झाली. या प्रवासात उभा मारूती चौक, खंडोबा तालीम येथे रिंगण पार पडले. पुईखडीकडे निघालेल्या पालखीत रथ, अश्व, बैलगाडय़ा यांचा समावेश होता. मुसळधार पाऊस कोसळत असतांनाही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.     
पुईखडी येथील जलशुध्दीकरण केंद्राजवळील मैदानात पालखीचे आगमन मोठय़ा उत्साहाने झाले. माउलीचा जयघोष व ज्ञानबा-तुकारामांचा जयघोष केला जात होता. पालखीचे दर्शन घेण्यासाठी अगोदरच जमलेल्या भाविकांनी एकच गर्दी केली होती. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पालखीचे पूजन केले. त्यानंतर रिंगण सोहळ्याला सुरूवात झाली. हा अनुपम सोहळा नजरेत साठविण्यासाठी भाविक आतुर झाले होते. रवी घाटगे यांच्या मानाच्या दोन सजविलेल्या अश्वांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पालखी व अश्व यांसह रिंगणात पाच फे ऱ्या मारण्यात आल्या. यापैकी एका अश्वावर विठूराया तर दुसऱ्यावर चोपदार बसतात, असे वारक ऱ्यांकडून मानले जाते. त्यामुळे अश्वाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी व भाविकांची लगबग उडाली होती. या ठिकाणी बाला अवधूत मेडिकल फौंडेशन व वालावलकर हॉस्पिटलने वैद्यकीय सेवा उपलब्ध केली होती.    
संकल्प-सिध्दी मंगल कार्यालयात माउलीची पालखी अल्पकाळासाठी विसावली होती. तेथे राधेय ग्रुप भजनी मंडळामार्फत प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदंगांच्या गजरात पालखी प्रती पंढरपूर नंदवाळकडे मार्गस्थ झाली. या प्रती पंढरपूरमध्ये दिवसभर वैष्णवांचा मेळा सजला होता.

Story img Loader