गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील एकमेकांविरोधात प्रचार केल्याच्या कारणांवरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप समर्थकांमध्ये सशस्त्र दंगल होऊन त्यात एकमेकांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. पत्रा तालीम परिसरात काल रविवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील २७ जणांविरूध्द गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीत पत्रा तालीम भागातील राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर पद्माकर ऊर्फ नाना काळे यांच्याविरूध्द काँग्रेसचे माजी नगरसेवक अमोलबापू शिंदे व भाजपचे बिज्जू संगप्पा प्रधाने हे उभे होते. यात काळे हे निवडून आले होते. परंतु या निवडणुकीत एकमेकांविरूध्द प्रचार केल्याबद्दल काळे व प्रधाने यांच्यात धुसफूस चालू होती. त्याचा स्फोट रविवारी मध्यरात्री झाला. यात संदीप ऊर्फ भैय्या लक्ष्मण पाटील (वय २५, रा. गायत्रीनगर, वसंतविहारजवळ, जुना पुणे नाका, सोलापूर)याने दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप याने महापालिका निवडणुकीत पद्माकर काळे यांचा प्रचार केल्याचा राग मनात धरून मध्यरात्री दीडच्या सुमारास अजय विष्णू जाधव, राजू प्रधाने, राजू लोणारी, दीपक जगताप, अभिजित लोणारी, अमोल लोणारी, पिंटू विनोद ठाकूर, मुकेश विलास घंटे, अभय संजय होळकर, सतीश संगप्पा प्रधाने, बिज्जू प्रधाने, अक्षय होळकर, अमर ढंगेकर, सुधीर ठाकूर, विजय जाधव (रा. लोणारी गल्ली, उत्तर कसबा) या सतराजणांनी संदीप पाटील व त्याचा सहकारी शेखर सुरवसे यांना गाठून तलवार, लोखंडी रॉड, काठय़ांनी हल्ला केला. यावेळी सतीश प्रधाने याने संदीप याच्या कानपटीला रिव्हॉल्व्हर लावले, तर बिज्जू प्रधाने याने तलवारीने त्याच्या डोक्यावर मारून खुनाचा प्रयत्न केला. तसेच शेखर सुरवसे यास अभिजित लोणारी याने तलवारीने मारून गंभीर जखमी केले. तर इतरांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला. तसेच पत्रा तालीम परिसरात दगडफेक करून दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या उलट, राजू कृष्णात लोणारी (वय ४०, रा थोरला मंगळवेढा तालीम, उत्तर कसबा)याने दिलेल्या फिर्यादीनुसार मध्यरात्री दीडच्या सुमारास राजू लोणारी व त्यांचे सहकारी लोणारी गल्लीत शक्तिदेवी मंदिराजवळ सभागृहात बसले असताना शेखर सुरवसे, प्रभाकर काळे, साईनाथ काळे, किरण प्रकाश काळे, दिगंबर बन्न्ो, संदीप पाटील, भय्या पाटील, पद्माकर काळे, खंडू बन्न्ो, संतोष काळे, देवू बन्न्ो (सर्व रा. पत्रा तालीम) या अकरा जणांनी तलवार, लोखंडी पाईप, काठय़ा घेऊन पालिका निवडणुकीतील राग मनात धरून हल्ला केला. यात राजू लोणारी व राजू प्रधाने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी घरांवर व वाहनांवर दगडफेक करून दहशत माजवून वाहनांचे नुकसान केले. याप्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिंदे हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे उत्तर कसब्यातील पत्रा तालीम, लोणारी गल्ली परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.