उन्हाळ्यामध्ये पुढील आठवडय़ात अमूक शहराच्या तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान खात्याने देऊन त्यानुसार आरोग्य विभाग, महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने जनजागृती केल्यास उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूवर आळा घालता येऊ शकतो. उष्माघाताने मृत्युमुखी पडण्यावर आळा घालण्यासाठी हवामान खाते अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडू शकते, असे स्पष्ट मत अहमदाबाद जिल्ह्य़ाचे आरोग्य उपसंचालक डॉ. दीपक मावळणकर यांनी व्यक्त केले.
नागपूर महापालिका आणि नागपूर आरोग्य उपसंचालक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल तुली इंटरनॅशनलमध्ये आयोजित ‘उष्माघातावर नियंत्रण कसे करावे’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून महापौर प्रवीण दटके उपस्थित होते. नागपूर विभागाचे आयुक्त अनुप कुमार, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, उपायुक्त संजय काकडे, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, अमरावती महापिालिकेचे आयुक्त चंद्रकांत कुंटेवार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रानंतर अहमदाबाद जिल्ह्य़ाने उष्माघातावर कसे नियंत्रण मिळवले, याचा अनुभव सांगताना डॉ. मावळणकर म्हणाले, २०१०च्या मे महिन्यात अहमदाबाद जिल्ह्य़ात उष्माघाताची एवढी लाट आली की त्यात १०० ते १२५ नागरिकांचा मृत्यू झाला. २१ मे २०१० रोजी तर अहमदाबादचे तापमान ४७ अंश सेल्सिअस एवढे होते. या एकाच दिवशी ३१० नागरिकांचा बळी गेला होता. तेव्हापासून आम्ही कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करत असतो. त्याचा फायदा असा झाला की, अहमदाबादमध्ये उष्माघाताने मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण घटले.
हवामान खात्याकडून पुढील आठवडय़ाच्या तापमानाची माहिती मिळाल्यानंतर अहमदाबाद महापालिका व आरोग्य खाते कृती आराखडा तयार करतात. शहराचे कमाल तापमान ४२ व ४३ अंश सेल्सिअसवर पोहचताच सावधतेचा व अतिसावधतेचा इशारा दिला जातो. अहमदाबाद महापालिकेचा आरोग्य विभाग, राज्याचा आरोग्य विभाग, विविध सामाजिक संघटना ही माहिती प्रसिद्धी पत्रक व इतर माध्यमातून नागरिकांना देतात. येथील वृत्तपत्रे हिरवा, पिवळा व लाल अक्षरात सूचना देतात. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडण्याबाबत अधिक जागरूक असतात. याशिवाय एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात येथील शासकीय व खासगी रुग्णालयात शीत वॉर्ड तयार केले जातात. अहमदाबाद महापालिका व आरोग्य खात्याकडून तयार करण्यात आलेल्या कृती आराखडय़ात जनजागृती करून नागरिकांना सावध करणे, विविध माध्यमातून सूचना तसेच डॉक्टर व आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या कृती आराखडय़ाची गेल्या चार वर्षांंपासून सतत अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूवर आळा बसला आहे. असा कृती आराखडा राबवून त्याची अंमलबजावणी केली तर नागपुरातही उष्माघाताने मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण कमी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर महापालिकासुद्धा शहरातील गोरगरीब रुग्णांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सध्या नागपुरात तीन ठिकाणी आश्रयस्थाने उपलब्ध असून त्यात आणखी वाढ केली जाईल, अशी ग्वाही महापौर प्रवीण दटके यांनी याप्रसंगी दिली. या कार्यशाळेमुळे नागपूर महापालिकासुद्धा कृती आराखडा राबवेल. त्याचा लाभ शहरातील नागरिकांना होईल, असे मत विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी व्यक्त केले. यावेळी नागपूर हवामान केंद्रातील हवामान तज्ज्ञ डॉ. ए.व्ही. घोडे यांनी चंद्रपूर येथे २००७ मध्ये सर्वाधिक ४९.०, नागपूरमध्ये २०१३ ला ४७.९ अंश तापमान होते, असे सांगितले. तसेच अमेरिकेत १९१३ मध्ये ५६.७ व आफ्रिकेत १९३१ मध्ये ५५.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याची माहिती देऊन नागपूर हवामान केंद्र पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा आणि तापमानाचा अंदाज जाहीर करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत डॉ. तेजल शहा, अभियान तिवारी, डॉ. पी.एस. गांगुली, डॉ. प्रिया दत्त, मेयोतील औषधशास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. पी.पी. जोशी यांनीही महत्त्वपूर्ण माहिती दिली. या कार्यशाळेला नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग तसेच नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्य़ांसह लातूर, नाशिक, अकोला जिल्ह्य़ातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक प्रामुख्याने उपस्थित होते.
वाढत्या तापमानाची माहिती आठवडय़ापूर्वीच द्यायला हवी
उन्हाळ्यामध्ये पुढील आठवडय़ात अमूक शहराच्या तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान खात्याने देऊन त्यानुसार आरोग्य विभाग,
First published on: 09-05-2015 at 12:50 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rising temperature information should give week ago says deepak mavalankar