पोलीस अधीक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांच्या पाठोपाठ कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. परिक्षेत्रात वाढत चाललेल्या गुन्हेगारीचा उल्लेख करून तिचा बिमोड करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे रितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर परिक्षेत्राचे मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण यांची पदोन्नतीने बढती झाली आहे. रिक्त झालेल्या पदावर रितेश कुमार यांची नियुक्ती झाली असून शनिवारी त्यांनी पदभार स्वीकारला. परिक्षेत्रातील सर्व पाच पोलीस अधीक्षकांची बैठक घेऊन त्यांनी आढावा घेतला. गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी, वाढीव पोलीस ठाण्यासाठी पाठपुरावा करणे या कामावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. रितेश कुमार यांनी यापूर्वी सांगली, नांदेड, लातूर येथे पोलीस अधीक्षक पदावर काम केले आहे. राज्यपालांच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख तसेच अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २००९ साली अप्पर पोलीस आयुक्त तर २०११ साली औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. दरम्यान कोल्हापूरच्या मावळत्या अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांची जालना येथे पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागी अंकीत गोयल यांची निवड झाली आहे. गोयल सध्या अमरावती येथे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत.

Story img Loader