शहरातील तपोवनात ३० मे ते सहा जून या कालावधीत पर्जन्यवृष्टीसाठी होणाऱ्या यज्ञ-याग विधीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) विरोध केला आहे.
यज्ञ करून निसर्गनियमात बदल करण्याचा अवैज्ञानिक दावा आयोजक करीत असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते, असे अंनिसने म्हटले आहे.
‘यज्ञ संस्कृती’ विज्ञानविरोधी व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी असल्याने राज्यघटनेची तत्त्वे उघडपणे पायदळी तुडविण्याचा हा प्रकार असल्याचे मत अंनिसने व्यक्त केले आहे.
यज्ञ करण्याची वेळ ही जाणीवपूर्वक पावसाळा सुरू होण्याच्या आधीची निवडण्यात आली आहे. ही बाब सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा व देवभोळेपणाचा गैरफायदा घेणारी आहे. यज्ञामुळे राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होते.
यज्ञातील आहुतीसाठी शेकडो क्विंटल धान्य आणि शेकडो लिटर दूध, तेल, तूप, अशा जीवनोपयोगी पदार्थाची जळून राख होते. दुर्मीळ व औषधी वनस्पती जाळून नष्ट केल्या जातात.
संतांच्या आणि समाजसुधारकांच्या सत्यशोधकी व पुरोगामी कृतिशील विचारांचा ‘पर्जन्यवृष्टीसाठी यज्ञ’ हा अपमान आहे. त्यामुळे नागरिकांनी सदर अवैज्ञानिक दाव्याचा तीव्रपणे कृतिशील निषेध नोंदवावा, असे आवाहन अंनिसतर्फे करण्यात आले आहे.

Story img Loader