शहराची जीवनवाहिनी असणाऱ्या पांझण व रामगुळणा या नद्यांची स्वच्छता मोहीम लोकसहभागातून येथील मनमाड बचाव समितीच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली. मनमाडकरांच्या सहाय्याने ही मोहीम महिनाभर सुरू ठेवण्यात येणार असून ‘पाणी अडवा आणि जिरवा’ अंतर्गत हे काम सुरू करण्यात आले आहे.
येथील पल्लवी मंगल कार्यालयासमोर रामगुळणा नदीपात्रातील गवत व इतर घाण जेसीबीसह इतर यंत्रणेव्दारे काढून पात्र मोकळे करण्याची मोहीम सुरू झाली आहे. याठिकाणी शहरातील गटारींचे पाणी एकत्र येऊन दरुगधी पसरली आहे. नदीच्या दोन्ही बाजूंकडील झरे, गाळ व कचऱ्यामुळे बंद झाल्याने परिसरातील कुपनलिकांनाही पाणी येत नाही. यासंदर्भात शासकीय यंत्रणा तसेच पालिकेकडे वारंवार तक्रारी करुनही दखल घेण्यात आली नाही. दरुगधीमुळे दोन्ही नद्यांच्या पात्रालगत राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. अखेर मनमाड बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शहरातील राजकीय, व्यापारी व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या सहयोगातून नदीपात्र स्वच्छता मोहीम सुरू केली. माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी काही दिवस या कामासाठी जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिले आहे. नदीपात्रातील गवत तसेच गाळ, कचरा आणि तुंबलेले पाणी यंत्राव्दारे बाजूला करण्यात आले. पहिल्याच दिवशी सुमारे १०० मीटर नदीपात्र स्वच्छ करण्यात आले.

Story img Loader