भारतात जिथे नदी तेथे संस्कृती रुजली, परंतु संस्कृतीच्या नावाखाली नदी व पर्यावरणालाच दूषित करण्यात येत आहे, असे प्रतिपादन डॉ. कैलास कमोद यांनी केले. येथील यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘नदी आपली आणि परदेशातील’ या विषयावर ते बोलत होते.
भारतात नद्यांची पूजा केली जाते, तरीही तिला दूषित केले जाते. विदेशात मात्र नदी आणि तिच्या सभोवतालच्या पर्यावरणाचा समतोल वर्षांनुवर्ष कायम राखला जात असल्याकडे डॉ. कमोद यांनी लक्ष वेधले. दक्षिण अमेरिकेतील अ‍ॅमेझॉन नदी हे जगातील एक आश्चर्य असून काही ठिकाणी या नदीचे पात्र ४६ किलोमीटर रुंद आहे. ब्राझील आणि पॅराग्वे या दोन देशांमधून वाहणाऱ्या इटॅपू या नदीवर त्या दोन्ही देशांनी संयुक्तपणे धरण बांधले आहे. या धरणावर जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे, अशी माहिती कमोद यांनी दिली. जगात सर्वात भव्य नदी म्हणून अ‍ॅमेझॉनचे नाव घ्यावे लागेल. त्यानंतर इजिप्तमधील नाईल नदी, तर तिसऱ्या क्रमांकावर निग्रो ही नदी आहे. ही नदीही दक्षिण अमेरिकन देशांमधूनच वाहते. युरोपातील नद्या दक्षिण अमेरिकेतील नद्यांपेक्षा आकाराने लहान आहेत. अर्जेंटिना, ब्राझील आणि पॅराग्वे या देशांच्या सीमांवरील तीन किलोमीटरचा इग्वासू धबधबादेखील नैसर्गिक आश्चर्यापैकी एक मानले जाते, असे डॉ. कमोद यांनी नमूद केले.
जंगालातून वाहत येणाऱ्या निग्रो या नदीचे पाणी काळसर असून जंगलातील जडीबुटी व पालापाचोळ्यामुळे पाण्याचा रंग असा झाला असला तरी हे पाणी आरोग्यवर्धक असल्याचे निरीक्षण डॉ. कमोद यांनी नोंदविले.

Story img Loader